पाच सराईत दरोडेखोरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2015 03:41 IST2015-09-14T03:41:46+5:302015-09-14T03:41:46+5:30
पालघर जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे, गाड्या लुटणे तसेच अपहरण यासारख्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण होते.

पाच सराईत दरोडेखोरांना अटक
जव्हार : पालघर जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे, गाड्या लुटणे तसेच अपहरण यासारख्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण होते. मात्र, जव्हार पोलिसांनी सातत्याने पेट्रोलिंग करून ५ सराईत दरोडेखोरांच्या टोळीला शनिवारी रात्री अटक केली. महादेव शेलार यांचे पथक पेट्रोलिंग करताना यशवंतनगर येथे संशयितरीत्या फिरणारे हे दरोडेखोर जव्हार पोलिसांच्या ताब्यात अडकल्याने अनेक गुन्ह्यांचा छडा लागू शकतो. या पाच जणांना वाडा न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पी.एस.आय. शेलार आणि त्यांचे सहकारी पोलीस पथक रात्री गस्त घालत असताना यशवंतनगर नाक्यावर दोन मोटारसायकल आणि ५ जण संशयितरीत्या उभे असलेले आढळल्याने शेलार यांनी त्यांची चौकशी सुरू केली. त्यात प्रत्येकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकाला संशय आला. त्यांनी त्यांच्याजवळील बॅगा तसेच डिक्की तपासली असता त्यात तीक्ष्ण व घातक हत्यारे, कटावणी, मिरची पावडर आढळल्याने त्यांना तत्काळ जव्हार पो. स्टेशन येथे आणण्यात आले.
तेथे पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी सर्व गोष्टी उघड केल्या. वाडा तसेच भिवंडी या भागातील हे गुन्हेगार असून त्यांनी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींची नावे आणि घटना पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर त्यांच्यावर वाडा पोलीस स्टेशनमध्ये अपहरण व खंडणी, विरार पो.स्टे. येथे दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याने जव्हार पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या तपासणीदरम्यान त्यांनी कुठे व कोणकोणते गुन्हे केले? त्यांचे आणखी साथीदार आहेत का? यासारखी महत्त्वाची माहिती उघड करण्यास अडथळे येऊ नयेत व त्यांचे साथीदार असतील, टोळी असेल तर ते सावध होऊ नयेत म्हणून आरोपींची नावे व फोटो गोपनीय ठेवण्याची विनंती पोलिसांनी प्रसिद्धिमाध्यमांना केली. या गुन्हेगारांनी प्राथमिक स्तरावर दिलेल्या गुन्ह्यांची कबुली व त्यांची व्याप्ती, स्वरूप पाहता मागील काळातील अनेक गुन्हे उघड होऊ शकतात.