मासेमारीला भरावाचा फटका
By Admin | Updated: December 24, 2014 22:37 IST2014-12-24T22:36:32+5:302014-12-24T22:37:04+5:30
: जेएनपीटी बंदराच्या अखत्यारीतील डी.पी. वर्ल्डनजीक चालू असणाऱ्या ३३० मीटरच्या नव्या जेटीच्या भरावांमुळे न्हावा, न्हावा खाडी आणि गव्हाण परिसरातील मासेमारी बाधित होत आहे.

मासेमारीला भरावाचा फटका
उरण : जेएनपीटी बंदराच्या अखत्यारीतील डी.पी. वर्ल्डनजीक चालू असणाऱ्या ३३० मीटरच्या नव्या जेटीच्या भरावांमुळे न्हावा, न्हावा खाडी आणि गव्हाण परिसरातील मासेमारी बाधित होत आहे. त्यामुळे हजारो स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी येत्या सोमवारी उरणच्या करळ फाट्यावर रास्ता रोको करण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे. या आंदोलनाबाबत जेएनपीटी प्रशासनाला १५ डिसेंबरलाच निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
उरणच्या जेएनपीटी बंदराच्या विस्तारीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. हे काम करताना केवळ मासेमारीवर उदरनिर्वाह असणाऱ्या न्हावा, न्हावा खाडी आणि गव्हाण परिसरातील मासेमारांना आणि स्थानिकांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई जेएनपीटीने जाहीर केलेली नाही. न्हावा गाव आणि न्हावे खाडी गावातील ९० कुटुंबांचा आणि त्यावर आधारित नागरिकांच्या मासेमारी होड्या असून त्याद्वारे याच समुद्र किनाऱ्यावर मासेमारी केली जाते. गाव परिसरातील ४० टक्के लोकांचा खाजणी मासळी पकडण्याचा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे हाताने निवटे ढोसणे, कालवं काढणे, फळीवर जाऊन किळशी, वाव पकडणे आदी प्रकारची मासेमारी ही येथील नागरिकांकडून केली जाते. ४५ कुटुंबे कालवं निर्माणाचे दगडी बंधारे याच समुद्र किनाऱ्यावर करीत आहेत. मासेमारीशी संबंधित या सर्व व्यवसायांवर भरावामुळे परिणाम होत आहे.
येथील नागरिकांना विस्तारित जेट्टीवर नोकऱ्या देण्यात प्राधान्य देण्याबरोबरच मासेमारांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला, कालवं निर्माणासाठीच्या बंधाऱ्याच्या मालकांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देण्यात यावा त्याचबरोबर स्थानिकांना न्हावा ते घारापुरी या प्रवासाकरिता न्हावा गावाजवळ सुसज्ज जेट्टी उभारुन द्यावी, अशी मागणी न्हावा ग्रामसुधारणा मंडळाने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत त्वरित पावले न उचलल्यास २९ डिसेंबरला रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
करळ फाट्यावर रास्ता रोको करण्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी न्हावा आणि न्हावा खाडी गावात नागरिकांनी शंभर टक्के आंदोलनात उतरावे यासाठी गावबैठका घेण्यात येत असून या बैठकांनाही जोरदार पाठिंबा मिळत आहे.