बोईसर : तारापूर एमआयडीसीतील के-७ प्लॉटमधील यू. के. ॲरोमॅटिक या अगरबत्ती व अगरबत्तीला लागणाऱ्या केमिकल बनवणाऱ्या रासायनिक कारखान्याला रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग इतरत्र पसरली. रविवारी कंपनीला सुट्टी असल्यामुळे कारखान्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही उपस्थित नव्हते.
धुराचे लोट दूरवरकारखान्यातील ज्वलनशील रसायनाचा स्फोट होऊन आग भडकत होती, तर जळते रसायन गटारातून वाहत येत असल्याने आग रस्त्यापर्यंत पोहोचली होती. धुराचे लोट दूरपर्यंत पसरले होते. घटनास्थळी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलिस निरीक्षक शिरीष पवार उपस्थित होते.
सर्व रस्ते केले होते बंदसुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी घटनास्थळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. घटनास्थळाहून सुमारे २०० मीटर दूर व रस्त्यापलीकडे असलेल्या बिंदिका कंपनीपर्यंत आग पोहोचली होती. मात्र, अग्निशमन दलाने आग वेळेत नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
आग नियंत्रणात आणली-आग विझवण्यासाठी एमआयडीसीच्या अग्निशमन दलासह तारापूर अणुऊर्जा केंद्र, पालघर, डहाणू व वसई-विरार नगर परिषदेच्या आणि डहाणूतील अदानी पॉवर इत्यादी ठिकाणांहून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीशी झुंज देत होत्या. -आग शेजारच्या श्री केमिकल व आदर्श कंपनीसह अन्य कारखान्यांत पोहोचू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.