महापालिकेच्या वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 22, 2017 02:10 IST2017-04-22T02:10:05+5:302017-04-22T02:10:05+5:30
शिपाई पुरवण्यासाठी मागवण्यात आलेल्या ठेक्यातील करारनाम्यात फेरफार करून बोगस कागदपत्रे तयार करून ठेकेदार आणि स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतल्याचा ठपका ठेवत

महापालिकेच्या वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल
वसई : शिपाई पुरवण्यासाठी मागवण्यात आलेल्या ठेक्यातील करारनाम्यात फेरफार करून बोगस कागदपत्रे तयार करून ठेकेदार आणि स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतल्याचा ठपका ठेवत पालघर अँटीकरप्शन ब्युरोने वसई विरार महापालिकेच्या वरिष्ठ लिपीकाविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश विठ्ठल थोरात असे वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. २०१४-१५ मध्ये महापालिकेने मालमत्तेची निगा राखण्यासाठी शिपाई पदासाठी निविदा मागवल्या होत्या. ३ जुलै २०१४ मध्ये ठेकेदार वरद एंटरप्राईझेस आणि उपायुक्तांमध्ये एक करारनामा झाला होता. त्यावेळी स्वत:चा आणि ठेकेदाराचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी थोरात यांनी करारनाम्यात फेरफार करून बोगस कागदपत्रे तयार केली होती. याप्रकरणी अँटीकरप्शनकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर अँटीकरप्शनला भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले होते. करारनाम्यातील अटींमध्ये बदल करावयाचा असल्यास सक्षम स्तरावर निर्णय घेणे आवश्यक असताना थोरात यांनी करारनाम्यातील अटी परस्पर बदलून आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार डिवायएसपी अजय आफळे यांनी दिल्यानंतर थोरात यांच्याविरोधात विरार पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
अन् पदावनती झाली
मध्यंतरी थोरात यांना पदोन्नती देऊन सहाय्यक आयु्क्त करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी अनधिकृत बांधकामांना संरक्षण दिल्याचा ठपका ठेऊन थोरात यांना निलंबित करण्यात आले होते. चौकशी झाल्यानंतर थोरात यांना पुन्हा कामावर घेण्यात आले होते. मात्र, त्यांची वरिष्ठ लिपीक पदावर पदावनती करण्यात आली होती.