जिल्ह्यातील शेकोटी संस्कृती लोप पावण्याची भीती; मोबाइलमध्ये जातो जास्त वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 00:10 IST2020-12-01T00:10:31+5:302020-12-01T00:10:55+5:30
पूर्वीच्या काळी थंडी बोचरी असल्याने गावात जवळपास प्रत्येक घरासमोर, अंगणात किंवा नाक्यांवर शेकोट्या पेटवल्या जात असत.

जिल्ह्यातील शेकोटी संस्कृती लोप पावण्याची भीती; मोबाइलमध्ये जातो जास्त वेळ
पाराेळ : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गावोगावी थंडीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटवल्या जात असत. एकत्र बसून शेकोटीची ऊब घेण्याबरोबरच तेथे जमलेल्या ग्रामस्थांच्या दिवसभरातील कामे, शेती, घरातील सुखदु:ख या विषयावर चर्चा रंगत असत. गावातील एकोप्याचे दर्शन यातून घडत असे. पण, गेल्या काही दिवसांत शेकोटीसाठी सहज उपलब्ध न होणारे सरपण आणि नागरिकांचा मोबाइल, लॅपटॉप यासारख्या उपकरणांत जाणारा अतिरिक्त वेळ यामुळे गावागावांतील शेकोट्यांचे प्रमाण आता कमी होते आहे. येत्या काळात ही शेकोटी संस्कृती हळूहळू लोप पावण्याची भीती व्यक्त होत आहे.
पूर्वीच्या काळी थंडी बोचरी असल्याने गावात जवळपास प्रत्येक घरासमोर, अंगणात किंवा नाक्यांवर शेकोट्या पेटवल्या जात असत. पण, आता गावपाड्यांवरची घरेही सजवलेली आहेत. पूर्वी अंगण शेणामातीने सारवलेले दिसे. आता नवनवीन फरशा बसवलेल्या दिसतात. अंगणातील फरशीचे नुकसान होऊ नये म्हणूनही या शेकोट्या जास्त पेटवल्या जात नाही. त्यातच शेकोटीसाठी लागणारे सरपण जंगलातूनही फारसे मिळत नाही. त्यामुळेही त्या कमी झाल्या आहेत. या शेकोट्यांभोवती जमून ग्रामस्थांच्या गप्पा रंगायच्या. मात्र, आता रिकाम्या वेळात प्रत्येक जण हातातील मोबाइलमध्ये दंग दिसतो. तरुणाई तर मिळेल त्या रिकाम्या वेळेत मोबाइलमध्येच डोकेे घालून बसते.
यापूर्वी ऑक्टोबरमध्ये सुरू होणारी थंडी निसर्गाचा समतोल बिघडल्याने आता डिसेंबर महिन्यात थोडी जाणवू लागली आहे. परिणामी, त्या थंडीचा नागरिक आनंद घेत आहेत. मात्र, शेकोट्यांचे प्रमाण जिल्ह्यातील गावागावांतून कमी होत असल्याची खंत वयस्कर लोक व्यक्त करत आहेत.