विक्रमगडमधील शेतकरी वळतोय भाजीपाला पिकांकडे
By Admin | Updated: January 5, 2016 00:52 IST2016-01-05T00:52:13+5:302016-01-05T00:52:13+5:30
पारंपरिक भात व नाचणीच्या शेतीने वारंवार दगा दिल्यानंतर विक्रमगड तालुक्यातील बळीराजा आता हिवाळ्यातील रब्बी हंगामाकडे वळला आहे.

विक्रमगडमधील शेतकरी वळतोय भाजीपाला पिकांकडे
तलवाडा : पारंपरिक भात व नाचणीच्या शेतीने वारंवार दगा दिल्यानंतर विक्रमगड तालुक्यातील बळीराजा आता हिवाळ्यातील रब्बी हंगामाकडे वळला आहे. काहींनी वीटभट्टी व्यवसाय किंवा शहराकडे जाऊन मोलमजुरीचा मार्ग निवडला असला तरी काही गावांमध्ये भाजीपाला लावल्याचे दिसत आहे.
पावसाळ्यात पेरणी, भाताची लावणी व अन्य मशागतीची कामे करून भातकापणी आटोपली की, पुन्हा त्यांचे डोळे खरीप हंगामाकडे लागलेले असायचे़ कारण, खरीप हंगामच त्याला जीवाभावाची साथ होती़ मात्र, अलीकडच्या दोन-चार वर्षांत शेतकरी थोडा आधुनिकतेच्या जगात वावरू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणेच पाण्याची योग्य अशी सोय असलेल्या शेतात हिवाळी हंगामात पालेभाज्या घेण्यात येत आहे. ़विहीर, नदी, नाले यातील पाण्याचे उपलब्ध स्रोत या पालेभाज्या पिकविण्यासाठी संजीवनी ठरत आहे़ पालेभाज्यांसाठी साखळी पद्धतीने नळाद्वारे, पाटाने किंवा विद्युत मोटारीने पिकांना पाणी पुरविले जात आहे़ त्यामुळे मळ्यावर काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांना मजुरीही अर्थार्जनाचा चांगला लाभ होऊ लागला आहे़ दुसरीकडे तयार झालेली ताजी भाजी शहरापर्यंत पोहोचू लागली आहे़ दूरवरून येणाऱ्या भाज्यांपेक्षा या गावठी भाज्यांना मागणीही चांगली वाढली आहे, असे येथील शेतकऱ्यांना सांगितले जाते़ (वार्ताहर)
हाताला पैसा मिळू लागला...
विक्रमगड तालुक्यातील, कावळे, शेलपाडा, विक्रमगड, माण, नागझरी, वसुरी, डोल्हारी, दादडे, तलवाडा, आंबिवली, कुंर्झे आदी भाग परिसरातून मोठ्या प्रमाणात रब्बी पीक घेतले जाते़ येथील मोकळ्या किंवा थोड्या अधिक जमिनीत कारली, दुधी, मिरची, गवार, वांगी, टोमॅटो, कोबी, फलॉवर, भेंडी, सिमला मिरची, चवळी, काकडी, माठ, भोपळा, मेथी, चवळी अशा विविध पालेभाज्या घेऊन त्या विक्रीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मुख्य बाजारात किंवा गावातच विकल्या जाऊ लागल्या आहेत.