एक्स्प्रेस हाय वे विरोधात शेतकरी एकवटले
By Admin | Updated: May 11, 2017 01:40 IST2017-05-11T01:40:59+5:302017-05-11T01:40:59+5:30
पालघर पूर्व भागात होणाऱ्या मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवेला शेतकरी संघर्ष समिती व ग्रामस्थांचा असलेला विरोध मनोर पोलीस ठाण्यात पोलीस

एक्स्प्रेस हाय वे विरोधात शेतकरी एकवटले
आरिफ पटेल।
लोकमत न्यूज नेटवर्क
मनोर : पालघर पूर्व भागात होणाऱ्या मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवेला शेतकरी संघर्ष समिती व ग्रामस्थांचा असलेला विरोध मनोर पोलीस ठाण्यात पोलीस, महसूल अधिकारी, संघर्ष समिती अध्यक्ष व सदस्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही अधिकच तीव्र झाला. या वेळी काहीही झाले तरी जमिनीचे मोजमाप होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका समितीतर्फे घेण्यात आली.
पालघर तालुक्यातील पूर्व जंगलपट्टी भागात येणारे नावझे, साखरे, दहिसर, खांलोली,धुकटन, वंदिवली, काटाले, लहोरे, निहे, नागझरी, लालोंढे,किराट, चिंचारे, रावते, अशी एकूण बारा गावे व पाड्यातील लोकांच्या शेतजमिनी, घरे मुंबई-बडोदा एक्सपे्रस हायवे मध्ये जाणार असून त्यांचे आयुष्य उध्वस्त होणार असल्याने संघर्ष समिती व गावकऱ्यांचा त्याला कायम विरोध रहाणार आहे असे अध्यक्ष संतोष पावडे व उपाध्यक्ष कमलाकर अधिकारी यांनी तहसीलदार महेश सागर याना सांगितले. त्या वेळी ते म्हणाले की, मोजणी करण्यास विरोध करू नका ती होऊ द्या. जमीन देणे न देणे हा तुमचा निर्णय आहे. या वर तुम्ही मिळून तोडगा काढा कोणा वरही अन्याय होऊ देणार नाही याची खात्री बाळगा. त्यावर कमलाकर अधिकारी यांनी आकरपट्टी पोफरण, महामार्ग क्र ८ मध्ये ज्यांच्या जमिनी, घरे गेली त्या शेतकऱ्यांची आजही काय अवस्था आहे ती पाहिली की, तुमच्यावर विश्वास कोण ठेवेल? असा प्रश्न केला.
या वेळी अप्पर पो. अधीक्षक बी. जी. यशोद , उपअधीक्षक निमित्त गोयल, मंडळ अधिकारी बर्वे, तलाठी भोईर संघर्ष समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी तहसीलदार म्हणाले की, रस्त्यामध्ये जाणाऱ्या जमिनीच्या मोजणीसाठी सहकार्य केले पाहिजे. जमिनीचा मोबदला त्यांच्या मागणीनुसार शासन मंजूर करेल विकासासाठी रस्ता होणे गरजेचे आहे. आम्ही त्यांना समजवले तरी काही मार्ग निघाला नाही.