६९ वर्षांत साधा बल्बही पेटला नाही
By Admin | Updated: August 25, 2015 22:44 IST2015-08-25T22:44:38+5:302015-08-25T22:44:38+5:30
डहाणू तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावपाडे अद्यापही विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली, मात्र ग्रामीण भागातील काही गावपाड्यांवर वीज पोहोचली नाही.

६९ वर्षांत साधा बल्बही पेटला नाही
- शशिकांत ठाकूर, कासा
डहाणू तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावपाडे अद्यापही विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली, मात्र ग्रामीण भागातील काही गावपाड्यांवर वीज पोहोचली नाही. यासंदर्भात महावितरणला अर्ज, विनंत्याही झाल्या, मात्र या भागाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.
डहाणू तालुक्यातील ओसरवीरा, सुकटआंबा, चळणी, किन्हवली, दिवशी, दाभाडी, सोनाळे, खानीव, सायवन आदी गावांसह काही पाडे अद्यापही विजेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे विजेवर चालणारे टीव्ही, फ्रीज, फॅन, संगणक, शेगडी आदी उपकरणे वापराचे सुख तर जाऊ द्या, पण रात्रीच्या वेळी अंधार दूर करण्यासाठीचे भाग्यही या जनतेच्या नशिबी नाही.
ओसरवीरा येथील लाइमपाडा, शिंगाडपाडा, लाखानपाडा, डोंगरीपाडा या पाड्यांना अद्याप वीज नाही. वीज मिळण्यासाठी या गावांतील नागरिकांनी ४ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीमार्फत वीज महामंडळ अधिकाऱ्यांकडे प्रस्तावही दिला होता. त्यानंतर, पाड्यांचा सर्व्हेही करण्यात आला आहे. मात्र, अद्याप विजेचा ठावठिकाणा नाही. येथील माजी पंचायत समिती सदस्य काशिराम रसाळ यांनी ओसरवीरातील चार पाड्यांवर अद्यापही विजेची सुविधा नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी मोठी गैरसोय होते, असे लोकमतला सांगितले.
लालफितीमुळे गैरमार्गाचा वापर
या लालफितीच्या कारभारामुळे नागरिकांनी ज्या पाड्यांना विजेची सुविधा आहे, तेथून लाकडी खांब गाडून उघड्या तारा खेचून दुसऱ्याच्या मीटरमधून वीज नेली आहे. अशा गैरमार्गाने वीज नेल्याने धोकाही संभवतो. तर, काही नागरिक मात्र अंतर खूप असल्याने अंधारातच राहतात. दरम्यान, गावातील नागरिकांनी वारंवार अर्ज, विनंत्या करूनही अद्याप विजेची सुविधा न दिल्याने संताप व्यक्त होत आहे. काही गावपाड्यांवर विजेचे खांबही उभे केले, मात्र अद्याप वीजवाहक तारा खेचलेल्या नाहीत.