१५ पैकी ३ हजार मजुरांनाच रोजगार हमी
By Admin | Updated: April 19, 2017 00:12 IST2017-04-19T00:12:53+5:302017-04-19T00:12:53+5:30
प्रत्येकाच्या हाताला काम आणि काम करणाऱ्याला दाम या तत्वाखाली अमलात आलेल्या रोजगार हमी योजनेची मोखाडा तालुक्यात दुरावस्था झाली आहे

१५ पैकी ३ हजार मजुरांनाच रोजगार हमी
मोखाडा : प्रत्येकाच्या हाताला काम आणि काम करणाऱ्याला दाम या तत्वाखाली अमलात आलेल्या रोजगार हमी योजनेची मोखाडा तालुक्यात दुरावस्था झाली आहे. राजगार नसल्याने येथील तरुणांनी आपल्या कुटुंब कबिल्यासह शहराची वाट धरली आहे. तालुक्यात आज घडीला १५ हजार ११८ जॉबकार्ड धारक असताना ३ हजार ६४५ मजुरांना रोजगार मिळतो आहे. बाकीचे बेकार असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
१९७७-७८ मध्ये या योजनेचे कायद्यात रूपांतर केले आहे. त्या अनुशंगाने सन २००५ मध्ये रोजगार हमी कायदा राज्यात लागू करून त्यानुसार महाराष्ट्राच्या मूळ रोह्यातील तरदूतीचे एकत्रीकरण करून देशात व महाराष्ट्र रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) कार्यान्वीत झाली. परंतु शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेला बासनात गुंडाळून ठेवण्याचे काम केले जात असल्याने आदिवासीची रोजगारा अभावी होणारी पायपीट थांबलेली नाही.
आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यात शेतीची कामे आटोपल्या नंतर या ठिकाणी रोजगाराचे कोणतेच साधन उपलब्ध नाही. पावसाळ्यात चार महिने शेतीचे कामे असल्याने कसाबसा रोजगार मिळतो. मात्र दिवाळीचा सन सपल्यानंतर इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी येथील भुमीपुत्र भिवंडी, विरार वसई, पालघर, भार्इंदर, ठाणे, मुबंई, नाशिक या ठिकाणी स्थलांतरित झाला आहे. यामुळे गावपाडे आजही ओस पडले आहेत.
तसेच स्थलांतरित होत असताना आदिवासी बांधव आपल्या मुलाबांळानं सोबत स्थलांतरित होत असल्याने लहान वयातच निरक्षरता या मुलांच्या माथी मारली जात आहे. परंतु रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पंचायत स्थरावर ५० टक्के तर यंत्रणेने ५० टक्के कामे करायची आहेत. (वार्ताहर)
तालुक्यात पंचायत समिती स्तरावर २७ पैकी १७ ग्रामपंचायतीमध्ये ५० कामे चालू असून १ हजार ९०४ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यंत्रणेच्या माध्यमातून तालुका कृषी कार्यालयाकडून १२ कामे सुरु असून १ हजार २७६ मजुरांना काम मिळाले आहे.
वनपरिक्षेत्र खोडाळा यांच्याकडून ६ कामे सुरु असून २९६ मजूर कामावर आहेत. वनपरिक्षेत्र मोखाडा यांच्याकडून २ कामे सुरु असून ५६ मजुर काम करत आहेत. सामाजिक वनीकरण विभागाकडून ५ कामे सुरु असून १८ मजुरांना रोजगार दिला जात आहे.
अशा सर्व विभागांमार्फत २५ कामे सुरु आहेत. त्यातून एक हजार ९०६ मजुरांना रोजगार मिळत आहे. यामुळे रोजगार हमीच्या अंतर्गत पंचायत समितीच्या स्थरावर आणि यंत्रेकडून ३ हजार ६४५ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे उर्विरत ११ हजार ७७३ जॉबकार्ड मजुरांचे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे.
रोजगाराबाबत बैठका चालू असून जसजशी कामाची मागणी येत आहे. त्यानुसार जास्तीत जास्त लोकांना काम देण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
- शक्ती कदम, तहसीलदार, मोखाडा
काम असेल तरच आमच्या खिशाला पैसा अडका असतो. आता पर्यत आम्ही एक दोन कामे केली आहेत. सध्या उन्हाचे प्रमाण वाढले असले तरी आम्ही सकाळच्या वेळेत कामे करू शकतो. आम्हला कामाची नितांत गरज आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- पांडुरंग गभाले, जॉबकार्ड धारक मजूर, धामशेत