विजेआधी पोहोचली बिले
By Admin | Updated: April 8, 2015 22:39 IST2015-04-08T22:38:37+5:302015-04-08T22:39:28+5:30
स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली तरी पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्या व पाडे अंधारात आहेत. त्यामध्ये पडघेजवळील हेदुटणे वाडीचा समावेश आहे

विजेआधी पोहोचली बिले
प्रशांत शेडगे, पनवेल
स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली तरी पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्या व पाडे अंधारात आहेत. त्यामध्ये पडघेजवळील हेदुटणे वाडीचा समावेश आहे. या वाडीत वीजजोडणी करण्यात आलेली नाही, तरी हजारो रुपयांची बिले आदिवासींच्या माथी मारण्यात आली आहेत.
पनवेल तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांवर पायाभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, वीज आणि पाणी आदी मूलभूत सुविधाही काही वाड्या आणि पाड्यांवर पोहचल्या नाहीत. जिल्हा सुधारणा योजनेतून काही आदिवासी वाड्यांमध्ये वीज जोडणीसाठी एकूण ३५ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. चार महिन्यांपूर्वी कामालाही सुरुवात झाली, मात्र ती फक्त नावापुरती. वीजजोडणीसाठी आदिवासी बांधवांनी अनामत रक्कम सुध्दा भरली. मात्र चार महिने उलटले तरी वाडीत दिवे पेटलेच नाहीत.
म्महावितरण व ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे आदिवासी आजही महावितरणच्या कार्यालयात खेटे मारत आहेत. विजेचे खांब बसविताना महावितरणने हेदुटणे वाडीतील लोकांकडून खांब बसविण्याचे काम करून घेतले. मात्र वीज जोडणी न झाल्याने त्यांच्या जीवनातील अंधकार काही दूर झालाच नाही.
गेल्या महिन्यात महावितरणने हेदुटणे वाडीतील आदिवासींना वीज बिले धाडली. या बिलांवर मीटर रिडिंगही दाखवण्यात आल्याचे वाडीतील कमली केशव ठाकूर या महिलेने सांगितले. याबाबत नावडा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे आदिवासींनी विचारणा केली असता, त्यांनी वीजजोडणीबाबत शहानिशा न करता बिले कमी करून दिली.