विक्रमगडमध्ये निवडणुकांची रणधुमाळी
By Admin | Updated: April 9, 2016 02:05 IST2016-04-09T02:05:17+5:302016-04-09T02:05:17+5:30
विक्रमगड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रमुख पक्षांमध्ये भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकपा, परुळेकर मंच, मनसे, बविआ, शिवसेना व अपक्ष आदी

विक्रमगडमध्ये निवडणुकांची रणधुमाळी
तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रमुख पक्षांमध्ये भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, माकपा, परुळेकर मंच, मनसे, बविआ, शिवसेना व अपक्ष आदी मिळून ७२३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत़ येत्या १७ एप्रिलला निवडणूक होत असल्याने आता उमेदवारांना प्रचारासाठी अवघा एक आठवडाच मिळणार आहे़ त्यामुळे कार्यकर्ते कामाला लागले असून उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे़ त्यासाठी उमेदवार आपल्या पॅनलसह मतदारांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करताना दिसत आहेत़
या निवडणुका विक्रमगड तहसीलदार कार्यक्षेत्रातील तलवाडा, विक्रमगड या मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये होत आहेत़ तालुक्याच्या राजकारणातील प्रमुख पक्षांमध्ये भाजपा-शिवसेना, माकपा, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडी हे मोठे आहेत. पक्षीय ताकद कितीही असली तरी यापूर्वी निवडून दिलेल्या उमेदवारांनी ग्रामपंचायतीमार्फत गावामध्ये किती विकासकामे केली आहेत, यावरही सारे काही अवलंबून राहणार आहे़ तालुक्यातील केगवा-बालापूर ग्रामपंचायतीमधील एकूण १३ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील ६ जागा या केगव्यामध्ये येत असल्याने वॉर्ड क्र-१ अ मधून अ.ज. महिला पिंकी मगन मालकरी व ज्योती यशवंत भावर, तर वॉर्ड क्ऱ २ ब मधून अ.ज. महिला अस्मिता नवशा लहांगे बिनविरोध निवडून आल्या आहेत.
>वसईमध्ये ११ ग्रामपंचायतींसाठी
२६८ उमेदवार रिंगणात
वसई : तालुक्यातील एकूण ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १४४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता २६८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. येत्या १७ एप्रिलला मतदान होणार असून आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.
वसई तालुक्यातील पोमण, चंद्रपाडा, खानिवडे, शिवणसई, उसगाव, शिरवली, मेढे-वडघर, आडणे-भिनार, माजिवली-दापिवली, सकवार आणि कळंभोर या ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १७ एप्रिलला होणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १४४ उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर, ४ जागांवर बिनविरोध निवड झाली.
आता २६८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये बहुजन विकास आघाडीविरुद्ध शिवसेना-भाजपा यांच्यात सामना होणार आहे. तर, काही ग्रामपंचायतींमध्ये श्रमजीवी संघटना ताकदीनिशी उतरली आहे.