Due to 'Deulbandh', Ganesha devotees, traders | ‘देऊळबंद’मुळे गणेशभक्त, व्यापाऱ्यांचा हिरमोड

‘देऊळबंद’मुळे गणेशभक्त, व्यापाऱ्यांचा हिरमोड

उमेश जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क 
टिटवाळा : अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची होणारी अलोट गर्दी हे जणू समीकरणच. परंतु, मंगळवारी दीड वर्षानंतर ‘अंगारकी’चा योग जुळून आला असतानाही वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे मंदिर न्यासने मंदिर भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी बंद ठेवल्याने भाविकांचा हिरमोड झाला. काहींनी बाहेरील बंद गेटमधून मंदिराचे दर्शन घेतले. तसेच तेथेच हार, फुले वाहिल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे शुकशुकाटामुळे व्यवसाय बुडाल्याचे पूजा साहित्य दुकानदार व रिक्षाचालकांनी सांगितले.  
कोरोनाच्या नवीन लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, असे आवाहन केले आहे. त्यामुळे येथील सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांनी ‘अंगारकी’ला येथील गणपती मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. भाविकांच्या गैरसोय टाळण्यासाठी न्यासने पार्किंगमध्ये एलएडी स्क्रीनद्वारे सोशल डिस्टन्सिंग पाळून दर्शन देण्यात आले. 
मंदिरात मंगळवारी सकाळी अभिषेक, पूजा, आरती झाली. नित्यनेमाने सर्व आरत्या व विधी ठरावीक पुजारी यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती विश्वस्त योगेश जोशी यांनी दिली. 
दरम्यान, मंदिर बंद असल्याने परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. परंतु, तुरळक प्रमाणात काही भक्त बाप्पाच्या चरणी नाही, पण मुखदर्शन घेण्यासाठी टिटवाळ्यात दाखल झाले. त्यात मंदिर बंद असल्याची कल्पना नसलेले काही जण होते. मात्र, त्यांना बंद गेटमधून मंदिराचे दर्शन घेऊन परतावे लागले. मंदिर बंद राहिल्याने पूजा साहित्य विक्री, प्रसादविक्रेते खाद्यपदार्थ  आणि  रिक्षाचालकांच्या व्यवसायावरही परिणाम झाला. 

मी नेहमी ‘अंगारकी’ला गणपती मंदिरात येतो. आज ही बाप्पाचे मुखदर्शन घेण्यासाठी आलो. परंतु, सर्वच गेट बंद असल्याने बाहेरूनच मंदिराचे दर्शन घेऊन परतावे लागले.     - दिलीप देवकर, भाविक 
‘अंगारकी’ म्हटली की आम्हाला पर्वणी असते. या दिवशी आमचा व्यवसाय ४०-५० हजारांवर जातो. परंतु, मंदिर बंद असल्याने हजार रुपयांचाही व्यवसाय झाला नाही.     - विनिता तरे, पूजा साहित्याची विक्रेती
‘अंगारकी’ला मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त टिटवाळ्यात येतात. त्यामुळे रिक्षाचालकांचा धंदा रोजच्यापेक्षा एका दिवसात चारपट होतो. आज मंदिर बंद असल्याने आमच्या धंद्यावर परिणाम झाला आहे. 
    - बाळा भोईर, रिक्षा युनियन अध्यक्ष, टिटवाळा

Web Title: Due to 'Deulbandh', Ganesha devotees, traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.