बंधाऱ्यांचा सुकाळ तरी पाण्याचा दुष्काळ !
By Admin | Updated: April 24, 2017 02:14 IST2017-04-24T02:14:22+5:302017-04-24T02:14:22+5:30
या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने गेल्या पंधरा वर्षांत करोडो खर्चून शेकडो बंधारे बांधले तरी त्यात निकृष्ट बांधकामामुळे

बंधाऱ्यांचा सुकाळ तरी पाण्याचा दुष्काळ !
वसंत भोईर / वाडा
या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने गेल्या पंधरा वर्षांत करोडो खर्चून शेकडो बंधारे बांधले तरी त्यात निकृष्ट बांधकामामुळे पाणी अजिबात साठत नसून भूजलाची पातळीही वाढलेली नाही. त्यामुळे हा पैसा अक्षरश: पाण्यात गेला आहे. त्यातूनच बंधाऱ्यांचा सुकाळ आणि पाण्याचा दुष्काळ अशी परस्परविरोधी स्थिती तालुक्यात आहे.
निसर्गाने दिलेल्या पाचही बारमाही नद्यांत मुबलक पाणी साठा आहे. त्यावर गेल्या पंधरा वर्षांत शेकडो बंधारे बांधले आहेत. मात्र निकृष्ट बांधकाम, बंधाऱ्यासाठी योग्य जागा न निवडणे व टक्केवारीमुळे बंधारे कोरडे पडलेले आहेत.तालुक्याला पंचनद्यांचे वरदान लाभले आहे. तानसा, वैतरणा, पिंजाळ, गारगावी, देहर्जा या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. मात्र नियोजनाचा अभाव असल्याने मार्च महिन्यात या नद्या कोरड्या पडत आहेत. गेल्या वर्षी तालुक्यात आदिवासी योजनेतून पाच बंधारे तर सर्वसाधारण योजनेतून सतरा बंधारे बांधण्यात आले. मात्र ते हीे मार्च महिन्यातच कोरडे पडले आहेत. तानसा नदीवर तानसा फार्म येथे गेल्या वर्षी ५५ लाख खर्च करून बांधलेला बंधारा कोरडा पडला आहे. पंधरा वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने काही कोटी रु पये खर्च करून मेट, कोंढला, अलमान, पीक, गुहीर व सांगे येथे कोकण बंधारे बांधले त्यांचे काम निकृष्ट आहे. यावर्षी गांध्रे (९ लाख २३ हजार) कोंढले (९ लाख) खरीवली ( १३ लाख) आवंढे (७ लाख) सोनशिव (९ लाख १३ हजार) ऐनशेत (१० लाख १७ हजार) पिंपरोली (१० लाख ६८ हजार) व तुसे येथील बंधाऱ्याची दुरूस्ती अशी कामे प्रस्तावित असून ती सुरू आहेत.