वाढवण बंदर नकोच!
By Admin | Updated: October 3, 2015 02:18 IST2015-10-03T02:18:57+5:302015-10-03T02:18:57+5:30
वाढवण बंदर हा प्रस्तावित प्रकल्प भूमिपुत्रांच्या माथी मारून स्थानिकांना विस्थापित करण्याच्या सरकारच्या धोरणाला कडाडून विरोध

वाढवण बंदर नकोच!
डहाणू : वाढवण बंदर हा प्रस्तावित प्रकल्प भूमिपुत्रांच्या माथी मारून स्थानिकांना विस्थापित करण्याच्या सरकारच्या धोरणाला कडाडून विरोध करण्यासाठी गुरुवारी नियोजित प्रकल्पस्थळी वाढवण शंखेश्वर मंदिर, समुद्रकिनाऱ्यावर विराट जनसमुदायाच्या उपस्थितीत सर्वपक्षीय वाढवण बंदर विरोध जाहीर सभा बुधवारी झाली. या जाहीर सभेतून वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी डहाणूच्या आसपासच्या ४० गावांच्या जवळपास २५ हजार ग्रामस्थांनी प्रस्तावित बंदराला विरोध करण्यासाठी शंखेश्वर मंदिर, वाढवण समुद्रकिनारा ग्रामस्थांनी भरून गेला होता. परिसरातील महिलांनीही या सभेला उपस्थिती नोंदवली.
वाढवण बंदराला एवढ्या मोठ्या जनसमुदायाचा विरोध असेल तर प्रकल्प माथी मारण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. सर्व राजकीय पक्षांना एकत्र येऊन विरोध करण्याचे आवाहन सेनेच्या अनंत तरे यांनी केले.
राजेंद्र गावित यांनी शेतकरी, डायमेकर, मच्छीमार यांना उद्ध्वस्त करणाऱ्या वाढवण बंदराला पूर्वीपासून विरोध असून वाढवण बंदरासाठी सरकारच्या धोरणाचा बुलडोझर सर्वप्रथम माझ्यावरून न्यावा लागेल, अशी प्रतिक्रि या नोंदवली. तर, आमदार आनंद ठाकूर यांनी वाढवण बंदरामुळे हजारो स्थानिक भूमिपुत्रांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याने असा अन्यायकारक प्रकल्प होऊ देणार नसल्याचे मत मांडले. मोदी सरकारने भूमिपुत्रांची मन की बात ऐकली पाहिजे, असेही ते म्हणाले.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी हजारो लोकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध लक्षात घेता कोणत्याही सरकारची प्रकल्प माथी मारण्याची हिम्मत होणार नाही. सर्व पक्षांनी जर मनावर घेतले तर वाढवण बंदर रद्द करण्याची ताकद लोकशाहीत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. आमदार कपिल पाटील यांनी भाजपा नेत्यांचा हा कुटील डाव कदापिही यशस्वी होऊ देणार नाही, एकाही भूमिपुत्राचे विस्थापन होऊ देणार नाही, असे सांगितले. या सभेला आमदार आनंद ठाकूर, आमदार हितेंद्र ठाकूर, शिवसेना नेते अनंत तरे, आमदार कपिल पाटील, आमदार विलास तरे, माजी आमदार मनीषा निमकर, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, माजी खासदार बळीराम जाधव, आदिवासी एकता परिषदेचे काका धोदडे, मच्छीमार नेते नरेंद्र पाटील, जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, प्रभाकर राऊळ, नारायण पाटील यांनी उपस्थित राहून बंदर विरोध चळवळीला पाठिंबा दर्शवला. (वार्ताहर)