शौचालयासाठी खड्डे खोदणारी ‘स्वच्छ भारत’ची जिल्हा अॅम्बेसेडर
By Admin | Updated: February 12, 2017 03:09 IST2017-02-12T03:09:42+5:302017-02-12T03:09:42+5:30
जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील सुशीला खुरकुटे हि महिला आपल्या शौचालयाचे दोन खड्डे एका लोखंडी पहरीच्या सहाय्याने तीन दिवसा पासून एकटीच खणत आहे

शौचालयासाठी खड्डे खोदणारी ‘स्वच्छ भारत’ची जिल्हा अॅम्बेसेडर
- हितेन नाईक, पालघर
जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील सुशीला खुरकुटे हि महिला आपल्या शौचालयाचे दोन खड्डे एका लोखंडी पहरीच्या सहाय्याने तीन दिवसा पासून एकटीच खणत आहे. हागणदारी मुक्तीसाठी चाललेल्या तिच्या ह्या मेहनतीची दखल घेऊन तिची निवड ‘स्वच्छ भारत मिशन’ची पालघर जिल्ह्याची अॅम्बेसेडर’ म्हणून केली आहे.
केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशनला २ आॅक्टोबर २०१४ पासून सुरुवात केली.देशातील संपूर्ण ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाकडे २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत शौचालय असावे व त्याचा निरंतर वापर व्हावा हा त्याचा उद्देश आहे.
पालघर जिल्हा परिषदेने १ लाख ४४ हजार शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले असून अजून त्यातील ७९ हजार शौचालये बांधण्याचे काम बाकी आहेत. त्यातच जव्हार, मोखाडा, वाडा, विक्र मगड हे तालुके १९ फेब्रुवारी पर्यंत हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांपासून ते अधिकारी, कर्मचारी आणि जनता या सगळ्यांचे या मोहिमेला उत्स्फूर्त सहकार्य लाभते आहे.
१जव्हार तालुक्यात कुपोषणाने बालमृत्यू होण्याचे सत्र सुरूच असल्याने व अस्वच्छतेमुळेही बालके मृत्युमुखी पडत असल्याचे सत्य आता जव्हारसारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील महिलांना उमजू लागले आहे. हे रोखण्यासाठी जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत अंतर्गत राजेवाडी गावातील सुशीला हनुमंत खुरकुटे या ३० वर्षीय महिलेला ग्रामपंचायती कडून शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रु पयांचे अनुदान प्राप्त झाले.मात्र विटा,सिमेंट,रेती,मजुरी ई. च्या खर्चा मुळे १२ हजार रु पयात शौचालयाचे काम पूर्ण होऊ शकत नसल्याने कुणाच्याही मदती शिवाय पहारीच्या सहाय्याने ती शौचालयाचे ५ फुटाचे खड्डे खणण्यासाठी तीन दिवसा पासून घाम गाळीत आहे.
२जमीन खडकाळ असल्याने ती फोडण्यासाठी तिला अथक परिश्रम घ्यावे लागत आहेत. घरात आठराविश्वे दारिद्र्य अशा वेळी नवरा रोजगारासाठी दाहीदिशा फिरत असतांना आपल्या दोन तान्हुल्यांचा सांभाळ एकीकडे करीत असतांना दुसरीकडे ती हे खड्डेही खोदत आहे. यामुळे होणाऱ्या बचतीचे पैसे अन्य कारणांसाठी वापरता येतील असेही तिने म्हटले आहे. शौचालय बांधणीसाठी आपण स्वत: मेहनत करणार असल्याचेही तिने सांगितले. त्यामुळे ह्या महिलेच्या कार्यातून इतरांनीही काही प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.
केंद्रीय स्वच्छता सचिवांनी केले
कौतुक
सुशिल खुरकुटे यांनी केलेल्या कामाची दखल केंद्रिय पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वर अय्यर यांनी घेऊन त्याचे टिष्ट्वटद्वारे कौतूक केले आहे.