पीक काढल्यानंतर कीटकनाशकांचे वाटप
By Admin | Updated: April 27, 2017 23:45 IST2017-04-27T23:45:29+5:302017-04-27T23:45:29+5:30
या तालुक्यातील कृषी विभागाचा भोंगळ कारभार सुरू असून त्याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. हरभ-याचे पिक निघून दोन महिने

पीक काढल्यानंतर कीटकनाशकांचे वाटप
वाडा : या तालुक्यातील कृषी विभागाचा भोंगळ कारभार सुरू असून त्याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. हरभ-याचे पिक निघून दोन महिने उलटल्यानंतर शेतकऱ्यांना आता हरभरा पिकावर फवारणी करण्यासाठी किटकनाशके देण्यात आल्याने कृषी विभागाचे घोडे हे नेहमीच वरातीमागून असते याचा प्रत्यय आला आहे.
कोकणात रब्बी हंगाम आॅक्टोबर नोव्हेंबर महिन्या मध्ये चालू होतो. आणि शेतकरी हरभरा, मूग, तीळ, वाल अशा पिकांची पेरणी करतात ही पिके फेब्रुवारी पर्यंत तयार होतात. या पिकांची काढणी झाल्यानंतरही आता तालुक्यातील सापने येथील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून २३ एप्रिल रोजी रोगप्रतिबंधक किटकनाशकांचे वाटप करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागा विरोधात असंतोष पसरला आहे.
नक्की ही औषधे फवारण्यासाठी दिली आहेत की शेतकऱ्यांना पिण्यासाठी? अशी संतप्त प्रतिक्रि या येथील शेतकरी विलास भोईर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी व्यक्त केली. किटकनाशकांचे वाटप हे पिक होते त्या वेळीच केले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बी.व्ही. वारे यांनी दिली. ती खरी असेल तर मग हरभऱ्याचे पिक अजून निघाले नाही असे समजायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. बहुधा ही किटकनाशके बोगस अथवा त्यांची मुदत संपलेली असावी म्हणून ती उशिरा कागदोपत्री वाटप दाखविण्यासाठी वाटली गेली असावी त्याच्या खरेदीत मलिदा खाल्ला गेला असावा , असा संशय शेतकरी व्यक्त करीत आहेत.