कासात महावितरणची अनागोंदी
By Admin | Updated: September 10, 2015 23:44 IST2015-09-10T23:44:13+5:302015-09-10T23:44:13+5:30
डहाणू तालुक्यातील ग्रामीणभागात महावितरणच्या अनागोंदी व गलथान कारभार सुरू आहे. वीजग्राहकांना प्रत्येक महिन्याला रिडींग न घेता अवाच्यासव्वा काही ग्राहकांना बिले आकारण्यात येत आहेत.

कासात महावितरणची अनागोंदी
- शशिकांत ठाकूर, कासा
डहाणू तालुक्यातील ग्रामीणभागात महावितरणच्या अनागोंदी व गलथान कारभार सुरू आहे. वीजग्राहकांना प्रत्येक महिन्याला रिडींग न घेता अवाच्यासव्वा काही ग्राहकांना बिले आकारण्यात येत आहेत. माजी मंत्री शंकर नम यांना घरगुती वापराच्या मीटरसाठी ६८ हजार ७०० रू. बिल मागील महिन्यात आले आहे.
दर महिन्यास सरासरी २ हजार रु. बिल भरूनही वर्ष अखेरीस कमी करून ६३ हजार ७०० रू. इतके बिल देण्यात आले. मात्र दुसरीकडे मिटर न वापरता वीजचोरी व आकडे टाकून वीज घेणाऱ्यांवर कोणतीही कारवाई महावितरण करतांना दिसत नाही.
कासा परिसरात घरगुती वापरासाठी काही ग्राहकांना महिन्याची १० ते १५ हजार अशी बिले अंदाजे दिली जात आहेत. नम यांना दिलेले बिल हे मिटर रिडींग वेळोवेळी न घेता प्रत्येक महिन्याला अंदाजे बिल महावितरणाने दिले व शेवटी एकदम बिल दिले. परंतु वर्षाच्या प्रत्येक महिन्यास त्यांना सरासरी १३० युनिट वीज वापरत असल्याचे तर मे महिन्यात मात्र एकदम ६,८४२ युनिट वीज वापर दाखविला आहे. आदिवासी व गरीब ग्राहकांनाही महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे व चुकीमुळे मीटर रिडींग न घेता भरमसाठ बेहिशेबी बिले दिली जात असल्याने त्यांना भरणे अशक्य होते. परिणामी अशा ग्राहकांची वीजजोडणी तोडले जाते. त्यामुळे कासा भागातील महावितरणच्या कारभाराबाबत शंकर नम यांनी वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली असून यामध्ये लवकर सुधारणा न झाल्यास ग्राहक वितरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढतील असे पुढे त्यांनी सांगितले.
या भागातील वीजबिले ही घरोघरी न पोहचविता कोणा एकाकडे गावात दिली जातात. त्यामुळे ती प्रत्येक ग्राहकाकडे नेहमी वीजबिल भरणा तारखेच्या नंतर पोहोचतात त्यामुळे प्रत्येक महिन्याला ग्राहकांना नाहक अधिक रक्कम भरावी लागते. या मीटर रिडींग व वीजबिले वाटपाचा ठेका खाजगी संस्थांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी व ग्रामीण भागातील गावामध्ये वर्षभरातून एकदम वीजलाईन दुरूस्ती केली जात नाही. तर बऱ्याच गावपाड्यावर वीजवाहक तार व खांब जीर्ण व नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात बहुतेक दिवस वीजगायब असते. तर इतर दिवशीही वीजपुरवठा वारंवार खंडीत होतो. तसेच गेल्या १० दिवसापासून वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. दरम्यान याबाबत चारोटी वीजकार्यालयातील शाखा अभियंता दळवी यांच्याशी संपर्क साधला असता वेळोवेळी मीटर व फोटोरीडींग न घेतल्याने एकदम जास्त बिले येत असल्याचे सांगितले.