नायगाव-खोचिवडेकरांची वणवण
By Admin | Updated: April 27, 2017 23:46 IST2017-04-27T23:46:03+5:302017-04-27T23:46:03+5:30
नायगाव खोचिवडे परिसरातील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. पाणी पुरवठा योजनेतून पाणी साठयासाठी उभारलेल्या जलकुंभालाही

नायगाव-खोचिवडेकरांची वणवण
विरार : नायगाव खोचिवडे परिसरातील ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. पाणी पुरवठा योजनेतून पाणी साठयासाठी उभारलेल्या जलकुंभालाही पाण्याची प्रतिक्षा करावी लागते आहे.
पाणी पुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेल्या जलकुंभांची अवस्था देखभाल दुरूस्तीविना दयनिय झाली आहे.शिवाय त्याला भेगाही पडल्या आहेत. त्यात योजनाच कार्यान्वीत न झाल्यामुुळे स्थानिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
या गावातील सोसायट्यां टँकरमार्फत पाणी मिळवून आपली तहान भागवत आहेत. मात्र, ग्रामस्थांनी रस्त्यावर, मुख्य वहिवाटीवर ओटे, पायऱ्या बांधून दगड मांडल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी टँकरचे पाणीही ग्रामस्थांच्या नशीबी राहिलेले नाही.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ६९ गावांसाठी असलेल्या पाणी योजनेत खोचिवडे गावाचा समावेश करण्यात आला होता.त्यानुसार काही वर्षांपूर्वी जलकुंभही उभारण्यात आले होते.मात्र,तेंव्हापासून जलकुंभालाच पाणी मिळाले नसल्यामुळे ते आता भेगाळलेल्या अवस्थेत पाण्याची वाट पाहत उभे आहे.
या योजनेच्या जलवाहिन्याही धूळ खात पडल्या आहेत. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय असलेली मासेमारीही मासळीच्या तुटवड्यामुळे धोक्यात आली आहे.
त्यामुळे या व्यवसायाबरोबरच छोट्या-मोठ्या नोकऱ्या करून मच्छिमार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित आहेत.पाण्याच्या टंचाईमुळे नोकरी करावी की पाण्याचा शोध घ्यावा.असा प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा राहिला आहे. त्यामुळे दरवर्षी उद्भवणाऱ्या या पाणी संकटावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी मागणी जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
(वार्ताहर)