डहाणूत आदिवासींचे बिऱ्हाड पाठीवर
By Admin | Updated: September 5, 2015 22:21 IST2015-09-05T22:21:28+5:302015-09-05T22:21:28+5:30
पालघर जिल्ह्यातील गौणखनिज तसेच डहाणू तालुक्यातील उद्योगबंदीमुळे हजारो आदिवासींवर रोजगारासाठी स्थलांतरीत होण्याची पाळी ओढावली आहे. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी

डहाणूत आदिवासींचे बिऱ्हाड पाठीवर
डहाणू : पालघर जिल्ह्यातील गौणखनिज तसेच डहाणू तालुक्यातील उद्योगबंदीमुळे हजारो आदिवासींवर रोजगारासाठी स्थलांतरीत होण्याची पाळी ओढावली आहे. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मुलाबाळांचे संगोपन करण्यासाठी त्यांच्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे डहाणूच्या अतीदुर्गम भागातील शेकडो आदिवासी तरूण रोजगार शोधण्यासाठी दिवसभर शहरी व बंदरपट्टी भागाबरोबरच तारापुर औद्योगिक वसाहत आणि गुजरात मधील वापी जी. आय.डी.सी सारख्या ठिकाणी सायकल तसेच मिळेल त्या वाहनाने जा-ये करीत आहेत.
पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठरविलेल्या डहाणूत केंद्र सरकारने १९९१ मध्ये एका अधिसूचनेद्वारे उद्योगबंदी लादल्याने गेल्या चोवीस वर्षात येथे कोणताही प्रकल्प किंवा कोणताही प्रकारचा कारखाना सुरू होऊ शकला नाही. उद्योगबंदीच्या नावाखाली या ठिकाणी कोणी साधी पिठाची चक्की देखील कोणी काढू शकले नाहीत. परिणामी लोकसंख्येत वाढ होत असल्याने सुशिक्षित बेरोजगार तसेच कुशल, अकुशल कारागिरांबरोबरच अंगमेहनत करणाऱ्या आदिवासी मजुरांना गुजरातच्या उंबरगाव औद्योगिक भागावर अवलंबून राहावे लागते. हिच स्थिती शहरी आणि बंदरपट्टी भागातील आहे.
शहरी भागातील तरूण, तरूणी अनेक प्रकारचे उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी अभावी आणि कोणताही उद्योगधंदा उभारू शकत नसल्याने गाव सोडून मुंबई, वापी, सुरत सारख्या शहराकडे धाव घेऊ लागला आहे. त्यामुळे शिक्षण घेऊन ही सुशिक्षित तरूणांना कोणतेही भवितव्य उरलेले नाही.
साडेचार लाख लोकसंख्ये पैकी सत्तर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या डहाणू तालुक्यात एकूण ४१ हजार ४९० जॉबकार्डधारक आहेत. त्यात मजुरांची संख्या १ लाख १४ हजार ३७२ एवढी असतानाही सध्या डहाणूत तेरा ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष लागवड, सिंचन विहिरीच्या कामावर फक्त १०५ आदिवासी मजूर आहेत तर सामाजिक वनीकरण तसेच वनप्रकल्प येथील कामावर १०९ असे केवळ २१४ आदिवासी मजूर आहेत. त्यामुळे डहाणूच्या पूर्व भागातील दिवसी, दाभाडी, वंकास, थिलोंडा, गडचिंचला, बापूगाव, रामपूर, किन्हवली, दाभोण, बांधघर, येथील शेकडो तरूण पावसाळ्याच्या दिवसात रोजगाराच्या शोधात बाहेर पडले आहे.