डहाणूच्या किनाऱ्यांचे सौंदर्य नष्ट होणार?
By Admin | Updated: August 30, 2015 21:35 IST2015-08-30T21:35:52+5:302015-08-30T21:35:52+5:30
हिरवाईने नटलेल्या डहाणू तालुक्याच्या परिसराने आपले नैसर्गिक सौंदर्य आजवर अबाधित ठेवले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून चिंचणीपासून थेट बोर्डी पर्यंतच्या समुद्र

डहाणूच्या किनाऱ्यांचे सौंदर्य नष्ट होणार?
शौकत शेख, डहाणू
हिरवाईने नटलेल्या डहाणू तालुक्याच्या परिसराने आपले नैसर्गिक सौंदर्य आजवर अबाधित ठेवले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून चिंचणीपासून थेट बोर्डी पर्यंतच्या समुद्र किनाऱ्याजवळ होणाऱ्या वाळूचा बेसुमार उपसा, सुरूच्या झाडांची कत्तल, भूमाफियांकडून होणारी राजरोस बेकायदा बांधकामे तसेच मेरी टाईम बोर्ड व पर्यटन विकास महामंडळाच्या उदासीन धोरणामुळे येथील निसर्गाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे येथील समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य हळूहळू नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र राज्याला एकूण ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. त्यापैकी सुमारे ३२० कि.मी. लांबीचा किनारा हा एकट्या ठाणे जिल्ह्याला लाभलेला आहे. तर त्यातील जवळपास पन्नास कि.मी.पेक्षा अधिक समुद्रकिनारा डहाणू तालुक्यात येतो. या निसर्गरम्य किनारपट्टीत पश्चिमेकडील चिंचणी, वरोर, वाढवण, गुंगवाडा, तडियाळी, डहाणू, आगर, नरपड, चिखला, बोर्डी ते झाईपर्यंतच्या किनाऱ्याचा समावेश होतो. गर्द झाडी, केतकीची झुडपे, नारळ, सुरूची झाडे त्यातच अधूनमधून चिवचिवणारी पाखरे, सुसज्ज हॉटेल्स, मंदिरे याच्या सानिध्यात उसळणारा फेसाळ समुद्र, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नासिक तसेच गुजरात राज्यातील हजारो पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. त्यामुळे हिवाळा असतो की उन्हाळा येथे वर्षभर पर्यटक येत असतात. परंतु रात्रंदिवस सुरू असलेल्या रेती उपसामुळे या भागांतील समुद्रकिनारा उद्ध्वस्त झाला आहे.दरम्यान गेल्या दोन तीन वर्षांपासून खवळलेल्या समुद्रातील महाकाय लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याने चिंचणीपासून बोर्डीपर्यंतच्या किनाऱ्याची प्रचंड धूप होऊन येथील तो पूर्णत: खचला आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर येथील मच्छिमारांची घरे, सुरूची बागे तसेच येथील सौंदर्य नष्ट होण्याची भीती धा. डहाणूचे उपसरपंच वशिदास अभिंरे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मदे यांनी व्यक्त केली. येथील समुद्राची धूप रोखण्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज असतानाही वारंवार मागणी करून ही मेरी टाईम बोर्ड, तसेच पर्यटन विकास महामंडळ याकउे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे डहाणू, आगर, नरपड, चिखला, बोर्डी, गुंगवाडा, तडियाळी इत्यादी गावातील समुद्र किनाऱ्यावर हजारो सुरूची झाडे आहेत.