डहाणू-विरार मेमूमध्ये महिलेची प्रसूती
By Admin | Updated: January 12, 2016 00:33 IST2016-01-12T00:33:18+5:302016-01-12T00:33:18+5:30
मेमूमधून सफाळेहून विरारला डॉक्टरकडे निघालेल्या महिलेने वैतरणा आणि विरार दरम्यान एका मुलीला जन्म दिला. विरार स्टेशनमध्ये पोलिसांनी धावपळ करून माता आणि मुलीला

डहाणू-विरार मेमूमध्ये महिलेची प्रसूती
वसई : मेमूमधून सफाळेहून विरारला डॉक्टरकडे निघालेल्या महिलेने वैतरणा आणि विरार दरम्यान एका मुलीला जन्म दिला. विरार स्टेशनमध्ये पोलिसांनी धावपळ करून माता आणि मुलीला जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले.
नम्रता किणी (२१) पती योगेश सोबत सफाळ्याहून विरारला जाणाऱ्या सकाळच्या ९.0५ च्या मेमूमधून विरार येथील संजीवनी हॉस्पीटलमध्ये निघाले होते. मात्र, गाडीने वैतरणा स्टेशन सोडल्यानंतर नम्रताला प्रचंड कळा येऊ लागल्या. डब्यातील महिला प्रवाशांच्या हा प्रकार लक्षात घेता त्यांनी नम्रताला मदत केली आणि अवघ्या काही मिनिटातच चालत्या गाडीत नम्रताने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
ही बातमी डब्यातील काही प्रवाशांनी मोबाईलवरुन विरार येथील रेल्वे पोलिसांना दिली होती. मेमू विरार स्टेशनमध्ये शिरताच महिला कॉन्स्टेबल सोनाली पवार यांनी क्वीक रिस्पॉन्स टीमसोबत अॅम्बुलन्स मधून नम्रता आणि तिच्या बाळाला हॉस्पीटलमध्ये दाखल केले. योगेश आणि नम्रताने लगेचच मिळालेल्या मदतीबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)