डहाणू तालुक्यातील ९ वीचे प्रवेश धोक्यात
By Admin | Updated: May 21, 2017 03:35 IST2017-05-21T03:35:26+5:302017-05-21T03:35:26+5:30
या तालुक्यात ५२ खाजगी शाळांमध्ये ९ वीचे वर्ग सुरू आहेत. शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते ७ वीच्या शाळेत ८ वी चा वर्ग असणे बंधनकारक केलेले आहे.

डहाणू तालुक्यातील ९ वीचे प्रवेश धोक्यात
- शौकत शेख । लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : या तालुक्यात ५२ खाजगी शाळांमध्ये ९ वीचे वर्ग सुरू आहेत. शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते ७ वीच्या शाळेत ८ वी चा वर्ग असणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळांमध्ये आठवीचा वर्ग सुरू करण्यात आलेला आहे. पण आता आठवी उत्तीर्ण झालेल्या मुलांना नववीत कुठे आणि कसा प्रवेश मिळवून द्यायचा हा प्रश्न पालकांना भेडसावतो आहे. तो वेळीच न सुटल्यास हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक फरपट होणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार पाच किमी परिसरात माध्यमिक शाळा असणे गरजेचे आहे. परंतु डहाणू या आदिवासीबहुल तालुक्यातील माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन तुकडी मंजूर नाही, बसायला जागा नाही अशी उत्तरे देऊन पालकांना पिटाळून लावत आहेत. त्यामुळे आपला पाल्य शिकला पाहिजे ही आशा उराशी बाळगून माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी गेलेल्या गरीब, निरक्षर पालकांच्या पदरी निराशा पडत आहे.
एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळांना घरघर लागलेली असतांना डहाणू, तलासरी सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांना नववीत प्रवेश मिळू नये ही महाराष्ट्रातील शिक्षणाची शोकांतिका आहे. या वर्षी आठवीत किती मुले उत्तीर्ण झाली व जिथे नववीची इयत्ता नाही अशा शाळांतील मुलांना कुठे आणि कसा प्रवेश द्यायचा याचे नियोजन माध्यमिक शिक्षण खात्याने केलेले नाही. हेच यावरून उघड झाले आहे. यामुळे ज्या शाळेत ही मुले आठवी उत्तीर्ण झाली त्याच शाळांना नववीचे वर्ग सुरू करायला लावणे योग्य ठरेल.
पालक झाले संतप्त
जर हा प्रश्न वेळीच सुटला नाही तर त्यासाठी मोर्चा काढण्याची सज्जता आदिवासी बांधवांनी केली आहे. मोर्चासाठी आमचा एक दिवसाचा रोजगार बुडाला तरी चालेल ते नुकसान आम्ही आमच्या लेकराबाळांसाठी सहन करू पण त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.
आता माध्यमिक शिक्षण अधिकारी इतके दिवस झोपले होते का व आता ते कोणती कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.