डहाणूतील यंत्रणाही निवडणुकीसाठी सज्ज

By Admin | Updated: April 16, 2016 00:32 IST2016-04-16T00:32:36+5:302016-04-16T00:32:36+5:30

पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून येत्या १७ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. डहाणू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी एकूण १७९२ अर्ज

Dahanu machinery ready for elections | डहाणूतील यंत्रणाही निवडणुकीसाठी सज्ज

डहाणूतील यंत्रणाही निवडणुकीसाठी सज्ज

डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून येत्या १७ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. डहाणू तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी एकूण १७९२ अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, चारपैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध तर एका ग्रामपंचायतीकडून एकही अर्ज दाखल झालेला नाही. शिवाय, काही प्रभागांतील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर, ५२ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ५८ ग्रामपंचायतींतील १३३८ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत.
डहाणू पंचायत समितीअंतर्गत एकूण ८५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यापैकी ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून रविवार, १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याकरिता २६० प्रभागांसाठी १७९२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २५५ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून ५२ अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान दाभले, आसवे आणि चिंबावे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. १९९५ पासून चंडीगाव या ग्रामपंचायतीकडून आजतागायत अर्ज दाखल नाही. विविध ठिकाणच्या १७ प्रभागांतील १४७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात ५८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार असून २३१ प्रभागांमधील १३३८ उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी डहाणूतील निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. २६० प्रभागांसाठी २३५ बूथ लावण्यात येणार होते. मात्र, वर उल्लेखिलेल्या चार ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत नसल्याने प्रभाग संख्या घटून २३१ झाली आहे. सदर निवडणुकीसाठी ३२ निवडणूक अधिकारी आणि १६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हाताळण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण संबंधितांना दिले आहे.

शनिवार, १६ एप्रिल रोजी म्हणजेच मतदानाच्या आदल्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा ताबा निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार असून त्यांना मतदान साहित्य मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवणे आणि माघारी घेऊन येण्यासाठी २९ खाजगी बसेस भाडेतत्त्वावर मागवण्यात आल्याची माहिती डहाणूतील निवडणूक यंत्रणेकडून लोकमतला देण्यात आली.

Web Title: Dahanu machinery ready for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.