डहाणू-बोर्डी मार्ग धोकादायक
By Admin | Updated: March 13, 2016 02:16 IST2016-03-13T02:16:11+5:302016-03-13T02:16:11+5:30
डहाणू बोर्डी या प्रमुख राज्यमार्गावर अवजड व अवैध वाहतूक सुरू असते. गुरूवार दि. १० मार्च रोजी नरपड खाडीपुलानजीक रस्त्यालगतच्या झाडावर राखेने भरलेले वाहन आदळून

डहाणू-बोर्डी मार्ग धोकादायक
बोर्डी : डहाणू बोर्डी या प्रमुख राज्यमार्गावर अवजड व अवैध वाहतूक सुरू असते. गुरूवार दि. १० मार्च रोजी नरपड खाडीपुलानजीक रस्त्यालगतच्या झाडावर राखेने भरलेले वाहन आदळून संपूर्ण राख रस्त्यावर पसरली. दिवसभर राखेचा ढिगारा हटविण्यात न आल्याने वाऱ्यामुळे राखेचे कण डोळे व नाकातोंडातून जात नागरीकांना त्रास सोसावा लागला. अपघातग्रस्त वाहन घटनास्थळी नसून डहाणू पोलीस घडल्या प्रकाराबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या मार्गावरील अवजड व अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डहाणू बोर्डी या प्रमुख राज्यमार्गावर अवैध रेती व क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतुक केली जाते. रात्रीच्या सुमारास राखेने भरलेली वाहन सुरू असतात. रस्त्यावर विविध ठिकाणी पडलेली राख वाऱ्यामुळे डोळे व नाकातोंडात जाऊन प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. प्रशासनाकडून आरोप फेटाळले जातात. गुरूवार दि. १० मार्च रोजी नरपड खाडीपुलानजीक झाडावर राखेने भरलेले वाहन आदळून घडलेल्या अपघातात राखेचा ढिगारा रस्त्यावर पसरला. झाडाचे नुकसान झाले असून वाहनाच्या फुटलेल्या काचांचे अवशेष धुम्रपानाचे साहित्य घटनास्थळी पडले होते. दिवसभर राखेचा ढिगारा उपसण्यात आला नव्हता. या अपघाताची डहाणू पोलीस ठाण्यात नोंद नसुन अपघातानंतर वाहनासह चालक पळून गेला.
घटनास्थळापासून डहाणू पोलीस ठाण्याअंतर्गत नरपड सागरी पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र नागरीकांनी मागणी करूनही चौकीवर पोलीस तैनात नसतात. त्यामुळे अवैध व जड वाहतुकीचे पेव फुटले आहे. रात्री आठ वाजेनंतर मार्गावरील प्रवास नागरीकांना धोकादायक वाटतो. पोलीसांनी वेळीच दखल न घेतल्यास अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारला येत नाही. (वार्ताहर)