दादडेची केंद्रशाळा शिक्षकाविना
By Admin | Updated: March 5, 2016 01:13 IST2016-03-05T01:13:46+5:302016-03-05T01:13:46+5:30
विक्रमगड तालुक्यातील दादडे येथील जिल्हा परिषद केंद्र्र शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ११ शिक्षक कार्यरत असून गेल्या १ मार्च २०१६ पासून एकही

दादडेची केंद्रशाळा शिक्षकाविना
तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील दादडे येथील जिल्हा परिषद केंद्र्र शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ११ शिक्षक कार्यरत असून गेल्या १ मार्च २०१६ पासून एकही शिक्षक शाळेमध्ये हजर नसून ४०० मुलांची जबाबदारी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या भरवशावर सोडून सर्व शिक्षक अधिवेशनाला गेले असल्याची माहिती हाती आल्यानंतर लागचीच तालुका श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पडवळे व शिष्टमंडळाने समक्ष शाळेमध्ये जाऊन पंचनामा केला आहे आणि त्याची प्रत गटविकास अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती संघटनेकडून लोकमतला देण्यात आली आहे़
विद्यार्थ्यांची गळती थांबावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा, यासाठी शासनाकडून तालुक्यातील प्रत्येक गाव-खेड्यापाड्यांत लोकसंख्येच्या निकषानुसार जिल्हा परिषद शाळा सुरू करण्यात आल्या आहेत़ परंतु, तालुक्यातील दादडे केंद्र शाळेतील ४०० विद्यार्थ्यांची जबाबदारी केवळ शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवून सर्व शिक्षक अधिवेशनाला गेले असल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़
गेल्या काही दिवसांपूर्वीच कासा (बु) केंद्र शाळेमध्ये हलगर्जीपणामुळे २५४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची मोठी घटना अद्यापही ताजी असताना पुन्हा हा हलगर्जीपणाच झाला असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे़ ही शाळा रस्त्यावरच असल्याने व शाळेमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थी फिरताना दिसत आहेत. यामध्ये एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल श्रमजीवी संघटनेने उपस्थित केला आहे़ या दरम्यान श्रमजीवी संघटनेने जाब विचारला असता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनंदा सुरेश कासट व सदस्य यांनी शाळेची जबाबदारी आमच्यावर सोपवून येथील सर्व शिक्षक अधिवेशनाला गेल्याचे सांगितले़ (वार्ताहर)