पालघरमधील अद्भुत दगडी भिंतीबाबत कुतूहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 10:59 PM2019-12-14T22:59:42+5:302019-12-14T23:00:08+5:30

भिंत निसर्गनिर्मित की मानवनिर्मित? : पुरातत्त्व खात्याचे मात्र दुर्लक्ष, सखोल अभ्यास करण्याची मागणी

Curious about the wonderful stone walls in Palghar | पालघरमधील अद्भुत दगडी भिंतीबाबत कुतूहल

पालघरमधील अद्भुत दगडी भिंतीबाबत कुतूहल

Next

- राहुल वाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : चीनची भिंत आपण ऐकली आहेच व ही भिंत बघण्याची सर्वांची इच्छादेखील असते. मात्र अशीच एक भिंत (बांध) पालघर जिल्ह्यातही असून दगडांची ही वैशिष्ट्यपूर्ण रांग अनेक ठिकाणी दृष्टीस पडते. ही भिंत मोठमोठ्या दगडांनी बनलेली आहे. कुतूहल निर्माण करणाऱ्या या अद्भुत भिंतीकडे पुरातत्त्व खात्याचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झालेले असून या भिंतीबद्दल अभ्यास करून ही भिंत निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित याचा शोध घेणे गरजेचे आहे.


विक्रमगड तालुक्यातील सातखोर, कावडास, आपटी, उपराळे, तलवाडा, डोल्हारी, खडकी, भोपोली, धारमपूर, कुर्नझे (तलवाडा) या गावांना तर वाडा तालुक्यातील मुंगुस्ते, आपटी, साई देवळी, घोडमाळ, असनस, गुंज, नांदणी, नंतर पुढे वज्रेश्वरीकडे ही भिंत गेली असल्याचे स्पष्ट दिसते. या शिला पूर्व-पश्चिम या अवस्थेत तुकड्यांमध्ये रचलेल्या दिसून येतात. या भिंतीला तेथील स्थानिक गावकरी भुईबांध व भीमबांध या नावाने संबोधतात. या भिंतीबाबत विविध दंतकथाही परिसरात सांगण्यात येतात. ‘अज्ञातवासात असताना पांडवांनी समुद्राला मिळणाºया सर्व नद्या अडवून एका रात्रीमध्ये पहाट होण्याआधी एक मोठा बांध बनवायला सुरुवात केली. पण हे त्यांच्या पत्नीला माहिती नव्हते. आपले पती काहीतरी काम करताहेत एवढेच तिला माहीत होते. त्यामुळे ती जेवणासाठी चटणी-भाकरी घेऊन आली तेव्हा तिने पाहिले की आपले पती सर्व नद्या अडवायला लागले आहेत.

जर या सर्व नद्या अडवल्या तर संपूर्ण राज्य पाण्यामध्ये बुडेल व हाहा:कार माजेल, हे लक्षात आल्यावर या सर्वांना थांबवायचे कसे हा प्रश्न तिला पडला, तेव्हा तिला कल्पना सुचली व तिने कोंबड्याचे रूप धारण करून बांग दिली. बांग ऐकताच ते सर्व बांध तसाच अर्धवट ठेवून अज्ञातवासात निघून गेले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या दुर्मिळ रहस्यमयी बाबीकडे शासकीय विभाग, इतिहासतज्ज्ञ, भूगर्भतज्ज्ञ, पुरातन विभाग या सर्वांनी या बांधाचा, भिंतीचा सखोल अभ्यास करावा, अशी मागणी निसर्गप्रेमी करीत आहेत.

चीनच्या भिंतीप्रमाणे पालघर-ठाणे जिल्ह्यात देखील एक दगडांचा भिंतीप्रमाणे बांध आढळून येतो. या भिंतीबद्दल मोठे कुतूहल असून हा बांध निसर्गनिर्मित आहे की मानवनिर्मित याचा शोध घेणे गरजेचे असून शासनाने लक्ष देऊन या दगडी भिंतीचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्त्व विभागाला आदेश द्यावेत आणि या भिंतीचा अभ्यास करून या दगडी भिंतीचे रहस्य लोकांपर्यंत आणावे.
- महेश कचरे, दगडी भिंत अभ्यासक व निसर्गप्रेमी

Web Title: Curious about the wonderful stone walls in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.