मांगूरमाशाची शेती करणाऱ्यांवर गुन्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:20 IST2020-02-09T23:19:54+5:302020-02-09T23:20:37+5:30
मांगूर प्रजातीचा मासा हा बांगलादेशातून अनधिकृतरीत्या भारतात दाखल झाला आहे.

मांगूरमाशाची शेती करणाऱ्यांवर गुन्हा?
पालघर : पर्यावरणास तसेच मनुष्याच्या जीवितास घातक असणाºया मांगूर माशाची शेती, प्रजनन, संवर्धन, वाहतूक, विक्री यावर हरित लवादाने बंदी घातल्याने जिल्ह्यातील या माशांची शेती करणाºया सर्व शेतकऱ्यांनी आपल्याजवळील मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभागाचे सहा. आयुक्त अजिंक्य पाटील यांनी दिले आहेत.
मांगूर प्रजातीचा मासा हा बांगलादेशातून अनधिकृतरीत्या भारतात दाखल झाला आहे. या माशाचे संवर्धन करताना कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याच्या आमिषाला बळी पडत खाण्यायोग्य नसलेले कुजके मांस त्या माशाला खाद्य म्हणून दिले जाते. यामुळे प्रदूषण वाढून अनेक घातक रोग निर्माण होण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने आदेश पारित करीत मांगूर माशाच्या उत्पादन, विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यात मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी मांगूर मत्स्यउत्पादक आणि मत्स्यवाहतूक करणारे यांच्यावर कारवाई तसेच मांगूर माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
मांगूर माशांची शेती करण्यावर लवादाच्या आदेशाने भारतातच कायद्याने बंदी आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात अनधिकृतपणे मत्स्यशेती करणाºयांनी आपले मत्स्यसाठे नष्ट करावेत अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- अजिंक्य पाटील, सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग, पालघर-ठाणे