महावितरण कार्यालयावर नगरसेवकांचा मोर्चा
By Admin | Updated: July 7, 2015 22:21 IST2015-07-07T22:21:03+5:302015-07-07T22:21:03+5:30
गेल्या काही दिवसापासून वसई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात महावितरणच्या कारभाराचा खेळखंडोबा झाला आहे. दररोज वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारामुळे नागरीक नगरसेवकांना जाब विचारु लागले आहेत.

महावितरण कार्यालयावर नगरसेवकांचा मोर्चा
वसई : गेल्या काही दिवसापासून वसई तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात महावितरणच्या कारभाराचा खेळखंडोबा झाला आहे. दररोज वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारामुळे नागरीक नगरसेवकांना जाब विचारु लागले आहेत. त्यामुळे आज नगरसेवकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. एकतर कारभार सुधारा नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
नालासोपारा शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून दर दोन तासाने वीजपुरवठा खंडीत होत आहे. या लपंडावा बाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरणचा कारभार सुधारलेला नाही. या विरोधात नागरीकांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. याप्रश्नी नगरसेवकांनी या प्रश्नी पाठपुरावा करावा यासाठी नागरीक गळ घालू लागले आहेत. आज माजी उपमहापौर रुपेश जाधव व अन्य सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित नगरसेवकांनी महावितरणला ९० कोटीचा आर्थिक निधी मिळूनही जुनाट साहित्य बदलण्याच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. तसेच भरमसाठ वीजबिल आकारणे व मीटर रिडींग न घेता बिले पाठवणे अशा प्रकारामुळे नागरीकांमध्ये असंतोष झाला असून कोणत्याही क्षणी आंदोलन होण्याच्या शक्यतेकडे त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी नगरसेवकांनी मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी लवकरचकार्यवाही करून वितरण व्यवस्थेत सुधारणा होईल असे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)