Coronavirus: वसई-विरारमध्ये रोज अडीच हजार नागरिकांचे लसीकरण; लसीचे डोस अपुरे पडू लागल्याचीही चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 00:31 IST2021-03-23T00:31:08+5:302021-03-23T00:31:20+5:30
पहिल्या टप्प्यात ३२,६५०, दुसऱ्या टप्प्यात ७,१११ जणांना डोस

Coronavirus: वसई-विरारमध्ये रोज अडीच हजार नागरिकांचे लसीकरण; लसीचे डोस अपुरे पडू लागल्याचीही चर्चा
पारोळ : वसई-विरार शहरात नागरीकरण वेगाने होत असल्याने शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचवेळी पालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे. दरम्यान, पालिका हद्दीत दररोज दोन-अडीच हजार जणांचे लसीकरण होत असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याच वेळी लसीचे डोस अपुरे पडू लागल्याचीही चर्चा होत आहे. फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त या सर्वांनीच डोस घेतले असून, आता दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण सुरू आहे.
वसई-विरार पालिकेने शहरांमध्ये १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात केली. त्यानुसार कोविशिल्ड या कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचे ३८ हजार ९०० डोस, तर कोव्हॅक्सिन या लसीचे ४ हजार ८०० डोस पालिकेला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने निर्देशित केल्यानुसार शहरातील ६० वर्षे पूर्ण केलेले वृद्ध, फ्रन्टलाइन वर्कर्स, ४५ वर्षावरील विविध व्याधीग्रस्त व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. यासाठी शहरात खासगी १० आणि शासकीय १४ अशा एकूण २४ ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यानुसार दररोज सुमारे दोन ते अडीच हजार नागरिकांचे लसीकरण होते. त्यानुसार आतापर्यंत ३२ हजार ६५० नागरिकांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ७ हजार १११ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.