CoronaVirus News: वसई-विरार परिसरातील हॅण्डवॉश सेंटर पडली धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:06 IST2021-04-09T00:05:42+5:302021-04-09T00:06:02+5:30
लाखोंचा खर्च पाण्यात; नळही गेले चोरीला, नागरिकांमध्ये नाराजी

CoronaVirus News: वसई-विरार परिसरातील हॅण्डवॉश सेंटर पडली धूळखात
नालासोपारा : कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने राज्य सरकारने सर्वत्र कडक निर्बंध लावले आहेत. वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत आयुक्त गंगाथरन डी. यांनी अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मनपाने पहिल्या लाटेच्या वेळी ५९ लाख ५० हजार रुपये खर्च करून सर्वसामान्य नागरिकांना हात धुण्यासाठी शहरांत अनेक ठिकाणी हॅण्डवॉश सेंटर उभारली होती, मात्र ही सेंटर सध्या धूळखात पडले असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट वसई-विरारमध्ये सुरू झाली असून एप्रिल महिन्यात तर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सामान्य नागरिकांना, दुकानदारांना, व्यापाऱ्यांना कोरोनाबाबत कडक निर्बंध लावले, पण मनपाचे १७ हॅण्डवॉश सेंटर अद्याप धूळखात पडल्याचे चित्र आहे. या केंद्रांतील नळ चोरीला गेले असून काही ठिकाणी गर्दुल्ल्यांनी या हॅण्डवॉश सेंटरला आपला अड्डा बनवला असून भाजीवाल्यांनीही कब्जा केला आहे. वसई विरार महानगरपालिकेने शहरातील सर्व इमारतींना प्रवेशद्वारावर हात धुण्याचे सॅनिटायझर (हॅण्ड वॉश बेसिन) बनविणे अनिवार्य केले. त्याचबरोबर शहरातील नागरिकांना कुठेही हात धुता यावे, निर्जंतुकीकरण करता यावे यासाठी हॅण्डवॉश सेंटर तयार केले. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र नागरिकांची उदासीनता, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे शहरातील सर्व हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून आहेत. नागरिक त्याचा वापर करतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यावर कुणाची देखरेख नसल्याने या हॅण्डवॉश केंद्रातील नळ चोरीला गेले आहेत. अविचाराने आणि घाईघाईने घेतलेल्या या निर्णयाने पालिकेचा पैसा पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वर्षी मनपाने कोरोनाकाळात १७ ठिकाणी हॅण्डवॉश सेंटर उभारले होते. मात्र हे सेंटर आता धूळखात पडले आहेत. लोकांना शहाणपण सुचवणारी मनपा याकडे कानाडोळा करत आहे. याबाबत मनपा अधिकाऱ्यांनाही सांगितले आहे.
- शिरीष चव्हाण,
माजी नगरसेवक, नालासोपारा.