Coronavirus : डाय मेकिंग व्यवसाय कोरोनामुळे संकटात, डहाणूतील लघुउद्योग ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 01:22 AM2020-03-19T01:22:23+5:302020-03-19T01:22:48+5:30

सोन्या-चांदीचे दुकानदार, कारखानदार कोरोनाच्या भीतीमुळे महिनाभरापासून ग्रामीण भागात येतच नसल्याने डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील पंचवीस ते तीस गावातील हजारो कुशल-अकुशल कारागीरांसोबत मजुरांवर बेकारीची कु-हाड कोसळली

Coronavirus: Crisis in Dye-making business due to corona | Coronavirus : डाय मेकिंग व्यवसाय कोरोनामुळे संकटात, डहाणूतील लघुउद्योग ठप्प

Coronavirus : डाय मेकिंग व्यवसाय कोरोनामुळे संकटात, डहाणूतील लघुउद्योग ठप्प

Next

- शौकत शेख
डहाणू : दिवसेंदिवस वाढणाऱ्या सोन्याच्या भावामुळे आधीच संकटात सापडलेल्या डहाणूच्या डायमेकिंग व्यवसायाला आता कोरोनाचा फटका बसला आहे. मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास, तामिळनाडू, राजस्थानबरोबरच देशविदेशातून येणारे सोन्या-चांदीचे दुकानदार, कारखानदार कोरोनाच्या भीतीमुळे महिनाभरापासून ग्रामीण भागात येतच नसल्याने डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील पंचवीस ते तीस गावातील हजारो कुशल-अकुशल कारागीरांसोबत मजुरांवर बेकारीची कु-हाड कोसळली असून डायमेकिंगसारखा लघुउद्योग ठप्प झाला आहे.
डहाणूच्या बंदरपट्टी भागातील गाव, खेड्यापाड्यात ८० वर्षांपासून डायमेकिंगचा व्यवसाय घरोघरी सुरू आहे. शासकीय किंवा खाजगी नोकरी करण्यापेक्षा वडिलोपार्जित आणि पारंपरिक व्यवसायात उच्च शिक्षण घेतलेले हजारो सुशिक्षित तरुण दिवसभर अंगमेहनत करून लोखंडी साचे तयार करीत असतात. डायची किंमतही चांगली मिळत असल्याने दिवसभरात पैशाची चांगली आवक होते. सुंदर कलाकुसर असलेले हे साचे प्रसिद्ध असल्याने सोन्या-चांदीचे दुकानदार, कारखानदार येथे येत असतात. काही तरुण हे साचे नेपाळ, दुबई, श्रीलंका, बांगलादेश, सिंगापूर, मलेशियाबरोबरच देशातील विविध राज्यात नेऊन त्याची विक्री करतात.

कोरोनाच्या भीतीमुळे अनेक मोठमोठ्या शहरातील सोन्या-चांदीचे दुकाने कारखाने बंद झाल्याने ग्राहक किंवा दलाल डायची आॅर्डर देण्यासाठी येत नाहीत. शिवाय तयार झालेले डाय घेण्यासाठी तयार नसल्याने आमची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. तसेच काम नसल्याने व्यवसाय बंद ठेवला आहे.

गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचे संकट घोंघावत असल्याने हजारो हातांना काम देणारा डायमेकिंग व्यवसाय आता संकटात सापडला आहे. बाहेरील राज्यातून येणारे ग्राहक भीतीमुळे बाहेर पडत नसल्याने तसेच काही राज्यात सोन्या-चांदीचे दुकान बंद असल्याने लोखंडी साच्याची मागणी पूर्णपणे घटली असून येथील हजारो डायमेकर्सवर रिकामे बसण्याची वेळ आली आहे. यामुळे डायमेकिंगसाठी आवश्यक त्या महागड्या मशीनचे मशीनचे हप्ते कसे भरणार या भीतीने डायमेकर धास्तावला आहे.

विक्रमगड येथे शासकीय कार्यालयातही गर्दी टाळण्याच्या सूचना
विक्रमगड : कोरोनाशी लढण्यासाठी खबरदारी हाच उत्तम पर्याय असल्याने विक्रमगड येथील बाजारपेठ बंद करण्यात आली. तसेच मोह आणि शेवता आरोग्य विभागाच्या इमारतीत येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्रीधर गालिपिली यांनी दिली.

डहाणूत कोरोनाचे दोन संशयित? :
डहाणू : कोरोनाचे दोन संशयित डहाणूत आढळल्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून हे दोन्ही रुग्ण उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण विभागाच्या वैद्यकीय निगराणीत आहेत. त्यांचे वैद्यकीय नमुने मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. थायलंड येथून संबंधित संशयित १० मार्च रोजी मुंबईत आला होता.
१३ मार्च रोजी डहाणू तालुक्यातील राई येथे आल्यावर १६ मार्च रोजी सर्दी, खोकला, ताप आल्यानंतर त्यांना कॉटेज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे दोन्ही संशयित पिता - पुत्र असल्याचे समजते. कोरोना संबंधित तपासण्या करण्यात आल्या असून याबाबतचे नमुने कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी दिली.
दरम्यान, डहाणू तालुक्यातील बोर्डी, घोलवड, टोकेपाडा, पटेलपाडा, राई, चिंचणी येथील १२ जणांची तपासणी करण्यात आली आहे. हे सर्वजण परदेशातून आल्याचे समजते. याबाबत प्रशासन सतर्क झाले असून कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे.

Web Title: Coronavirus: Crisis in Dye-making business due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.