सांडपाणी लाइनचे काम सुरू
By Admin | Updated: January 3, 2016 00:25 IST2016-01-03T00:25:32+5:302016-01-03T00:25:32+5:30
तारापूर एमआयडीसी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून नवीन पाईप लाईनद्वारे नवापूर गावातून समुद्रात ७.१ कि. मी. आतमध्ये प्रदुषीत पाणी सोडण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.

सांडपाणी लाइनचे काम सुरू
- हितेन नाईक, पालघर
तारापूर एमआयडीसी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून नवीन पाईप लाईनद्वारे नवापूर गावातून समुद्रात ७.१ कि. मी. आतमध्ये प्रदुषीत पाणी सोडण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. समुद्रात पाईपलाईन टाकायला आम्ही परवानगी दिली नाही असे ग्रामसभेत ठणकावून सांगणाऱ्या ग्रामपंचायतीने विकास निधी मिळावा म्हणून आपल्या क्षेत्रातून पाईपलाईन टाकण्यास परवानगी दिल्यामुळेच आता समुद्रखाड्यामधील प्रदूषण भविष्यात वाढत जावून मत्स्यसंपदा हळूहळू नष्ट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या समुद्रकिनारा देशात सर्वाधिक प्रदूषित होत आहे असा ठपका केंद्रशासनाच्या समुद्री विज्ञान संस्था (एनआयओ) आणि राज्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी एकत्रितरित्या दिलेल्या अहवालात ठेवला आहे. झपाट्याने वाढत चाललेले औद्योगिकरण, शहरीकरण आणि कोणत्याही प्रक्रियेविना पाण्यात थेट सोडण्यात येणारे रासायनिक प्रदूषित घटक याला सर्वस्वी जबाबदार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. तारापूर मधील काही कारखाने व ऊर्जा प्रकल्प व प्रदूषीत पाण्यामुळे येथील खाड्यातील सागरी जैवविविधता व मासेमारीवर विपरीत परिणाम झाल्याचेही म्हटले आहे.
पालघर तालुक्यातील सातपाटी, मुरबे, उच्छेळी, दांडी, नवापूर, खारेकुरण, वडराई, माहीम, इ. गावातील समुद्र-खाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात तारापूर औद्योगिक वसाहत व पालघर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामधून प्रक्रिया न केलेले किंवा सामुदायिक सांडपाणी प्रक्रियेच्या पाईपलाईनमधून प्रदूषित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी खाडीतील माशांना, शिंपल्यांना रॉकेलमिश्रींत वास येऊन पाण्यावर मृतावस्थेत तरंगणारे मासे आढळून येत आहेत. अशावेळी खाडीतील मासेमारीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा मार्गच बंद होत आहे. असे असतांना मच्छीमारांचे गाव असलेली नवापूर ग्रामपंचायत गावाच्या विकासकामापोटी वर्षाला टीमा कडून मिळणाऱ्या सुमारे ४० लाख रू. च्या विकासनिधीसाठी पाईपलाईन टाकायला परवानगी देत असेल तर आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच असा सुर मच्छीमारांमधून उमटत आहे.
तारापूर मधील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रापासून नवापूर गावातील ३.६ कि. मी. पर्यंतची जुनी पाईपलाईन बदलण्याचे काम रूद्राणी कंस्ट्रक्शनमार्फत सुरू आहे. तर पुढे समुद्रात ७.१ कि. मी. पाईपलाईन टाकण्याचा ठेका एस.एस.सी., व्हियुबी इ. कंपन्यांना देण्यात आले आहे. हे काम २५ मे २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याने एमआयडीसीकडून सध्या नवापूरच्या समुद्र किनाऱ्यावर पाईपलाईनचे काम सुरू असल्याचे एमआयडीसीचे उपअभियंते आर. पी. पाटील यांनी सांगितले. या कामापोटीच्या परवानगीसाठी टीमाने नवापूर ग्रामपंचायतीला सुमारे ४० लाखाचा विकासनिधी तर एमआयडीसीकडून शौचालय, रस्ते, वॉल कंपाऊंड इ. सोयी पुरविल्या जाणार आहेत.
वाढवण बंदर, जिंदाल बंदरासह प्रदुषीत सांडपाण्याच्या पाईपलाईन समुद्रात सोडून आम्हा मच्छीमारांना पुरते उध्वस्त करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे.
- मानेंद्र आरेकर, उपाध्यक्ष ठाणे
जिल्हा मच्छीमार समाज संघ
नवापुर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने समुद्रात पाईपलाईन टाकण्यासाठी काही शतीअटी घालून परवानगी दिली आहे.
- अंजली बारी, सरपंच,
नवापूर ग्रामपंचायत