सदनिका देण्याच्या नावावर केली ग्राहकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 23:50 IST2019-09-25T23:50:36+5:302019-09-25T23:50:43+5:30
ग्राहकांनी दिले ५६ लाख; बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल

सदनिका देण्याच्या नावावर केली ग्राहकांची फसवणूक
नालासोपारा : वसई पूर्वेकडील गोखिवरे परिसरात सदनिका देतो, असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. काही बांधकाम व्यावसायिकांनी स्वस्त दरात चांगल्या सदनिका देतो, असे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक केल्याचेही सूत्रांकडून कळते. या सर्व फसवणूक झालेल्या ग्राहकांनी वालीव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली असून १२ बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या व येथेच खाजगी क्लास घेणाºया विनोद श्रीधर देसाई (४०) या शिक्षकाने २०१५ मध्ये विकास घनश्याम तिवारी याच्या गोखिवरे येथील विद्या विकासिनी शाळेच्या मागे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सदनिका बुक केली होती. त्यांच्यासोबत अनेक ग्राहकांनी सदनिका बुक केल्या होत्या. जेव्हापासून सदनिका खरेदी केल्या आहेत तेव्हापासून यांच्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत गोपालभाई पटेल, पवन चंद्रप्रकाश तिवारी, अस्लम हारून मेमन, लेणी, अमित, आशिष पांडे, पंकज मिश्रा, मानिज झा, अजय मिश्रा आणि अमन गायकवाड यांच्या विरोधात फसवणूक, एमपीआयडी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सर्व ग्राहकांनी १२ बांधकाम व्यावसायिकांना वेळोवेळी ५६ लाख ९६ हजार ६८७ रुपये धनादेशाद्वारे आणि रोख स्वरुपात दिले आहेत. तेव्हापासून सदनिकाही नाही आणि दिलेले पैसेही परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ग्राहकांनी वालीव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.