प्रायोगिक तत्त्वावर वाळूचे बंधारे उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:16 IST2019-11-18T23:16:10+5:302019-11-18T23:16:12+5:30
पहिला पायलट प्रोजेक्ट केळवे येथे; ४९ दगडी बंधाऱ्यांना न्यायालयाची स्थगिती

प्रायोगिक तत्त्वावर वाळूचे बंधारे उभारणार
- हितेन नाईक
पालघर : राज्यातील मंजूर झालेल्या ४९ दगडी बंधाऱ्यांना न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश निघाल्याने केंद्र शासनाने मच्छीमारांच्या घरांना धडकणाºया लाटांना थोपवून धरण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वाळूचे बंधारे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून केळवे येथे बंधारा उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सतत होणाºया वाढीमुळे किनाºयावरील घरांना निर्माण झालेला धोका पाहता राज्य शासनाने राज्यातील समुद्र किनारपट्टीवर ४९ गावांना दगडी बंधारे बांधण्यास २०१६ - १७ मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, गरज नसताना राजकीय लाभ उठविण्यासाठी किनाºयावर होणाºया बंधाºयाच्या उभारणीमुळे समुद्रातून होणारे रेतीचे वाहन थांबून ठिकठिकाणी रेतीचे सॅण्डबार तयार होऊ लागले. या दगडी बंधाºयामुळे पाण्याच्या प्रवाहात बदल होऊन आजूबाजूच्या भागातील किनाºयाची धूप होऊ लागल्याने ‘वनशक्ती’ या पर्यावरण रक्षणासाठी काम करणाºया संस्थेने हरित लवादात याचिका दाखल केल्याने राज्यातील ४९ बंधाºयाच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सातपाटी, कळंब, अर्नाळा, आशापुरा, एडवन, तारापूर, नवापूर, गुंगवाडा, तडीयाळे, दांडेपाडा (चिंचणी) अशा मंजुरी मिळालेल्या १० बंधाºयांच्या उभारणीला अडचणी निर्माण झाल्या होत्या. दोन वर्षांपासून बंधारे उभारणीची कामे बंद असल्याने किनारपट्टीवरील घरांना समुद्राच्या महाकाय लाटा धडकू लागल्याने लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.
जिल्ह्यातील बंधारे उभारणी बंद झाल्याने लोकांच्या जीवितास निर्माण झालेल्या धोक्याबाबत शिवसेनेचे खा. राजेंद्र गावित यांनी लोकसभेत आवाज उठविल्यानंतर केंद्र शासनाने केळवे येथे ६०० मीटर्सच्या बंधाºयासाठी २ कोटी रुपयांची मंजुरी दिली होती. हा वाळूचा बंधारा उभारणीचा पायलट प्रोजेक्ट हा प्रयोग राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे पतन विभागाचे अभियंते चोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सीआरझेडच्या नॉर्मप्रमाणे किनाºयापासून काही अंतरावर किनाºयावरील जमलेल्या वाळूचा वापर करून जिओ बॅगमध्ये भरून एक वाळूच्या पोत्यांची भिंत तयार करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे त्या भिंतीच्या पुढे समुद्राच्या दिशेने आणखी एक वाळूच्या पोत्यांची भिंत उभारली जाणार आहे.
समुद्राच्या जवळील उभारलेल्या भिंतीमुळे लाटांचे आक्रमण थोपवले जाणार आहे. त्यामुळे दोन भिंतींच्यामध्ये असणाºया जागेत वाळू साचून एक बीच तयार होणार असून केळवे पर्यटन स्थळाला भेट देणाºया पर्यटकांसाठी ते एक आकर्षण ठरणार असल्याचा दावा ठेकेदार निमित गोहेल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे.