गटशिक्षण अधिकाऱ्यांविरोधात पंचायत समिती सदस्याची तक्रार
By Admin | Updated: November 7, 2015 00:20 IST2015-11-07T00:20:49+5:302015-11-07T00:20:49+5:30
पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी महिला सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्या इंदिरा बाळू मिसाळ यांच्याशी वाद घालून बाचाबाची केल्याची घटना नुकत्याच

गटशिक्षण अधिकाऱ्यांविरोधात पंचायत समिती सदस्याची तक्रार
विक्रमगड : पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी महिला सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्या इंदिरा बाळू मिसाळ यांच्याशी वाद घालून बाचाबाची केल्याची घटना नुकत्याच झालेल्या मासिक सभेत घडली.
याबाबत पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. गटविकास अधिकाऱ्यांनी एका महिला पंचायत समिती सदस्यासोबत बाचाबाची करणे शोभा देत नसल्याचेही त्या म्हणाल्या.
इंदिरा मिसाळ यांच्या मतदारसंघातील खुडेद (कुडाचापाडा) येथील अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या निवडीबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. मात्र, ग्रामसभेतील प्रोसिडिंग (इतिवृत्त) बाबत ठराव नामंजूर असताना खुडेद गावच्या सरपंचांनी बोगस ठराव लिहून फेरफार करत ग्रामसेवकाची खोटी सही केली.
पंचायत समितीत हा ठराव सादर केला असता ही फसवणुकीची बाब मिसाळ यांच्या लक्षात आली आणि सभेत त्यांनी याबाबत विचारणा केली. त्यावर याबाबत कोणतीच शहानिशा न करता गटविकास अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी वाद घालून बाचाबाची केली.
याबाबत मला योग्य न्याय मिळाला नाही तर पंचायत समितीच्या आवारात आंदोलन करण्याचाही इशारा मिसाळ यांनी दिला आहे. (वार्ताहर)