- धीरज परब
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेच्या स्व. गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलातील तरणतलावात १० वर्षांच्या ग्रंथ मुथा ह्या मुलाच्या बुडून मृत्यूप्रकरणी महापालिका आयुक्त यांनी नेमलेल्या तिघा अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने आपला अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. अहवालात ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासह अनामत रक्कम जमा करावी आणि संबंधित अधिकारी ह्यास नोटीस बजावून खुलासा मागवावा आदी कार्यवाहीची शिफारस नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाईंदर पूर्वेला न्यू गोल्डन नेस्ट जवळ असलेले महापालिकेचे क्रीडा संकुल साहस चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस चालवण्यास दिले आहे. २० एप्रिल रोजी ग्रंथ हा तरण तलावात पोहताना बुडून मरण पावला होता. या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होऊन नवघर पोलीस ठाण्यावर निषेध फेरी काढली होती. तर नवघर पोलिसांनी ठेकेदार, व्यवस्थापन वर्ग व चार प्रशिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी २१ एप्रिल रोजी महापालिकेने ईमेलद्वारे ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली असता ठेकेदाराने खुलासा पाठवला. आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी २३ एप्रिल रोजी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांच्या अध्यक्षते खाली शहर अभियंता दीपक खांबित, क्रीडा अधिकारी दिपाली जोशी यांची चौकशी समिती नेमली.
त्यात आयुक्तांनी ठेकेदार सोबत केलेल्या करारनाम्यातील अटी शर्तींचे पालन होत आहे का? तपासणे, तरण तलाव येथे आवश्यक जीवरक्षक व सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनाचा आढावा घेणे, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची तपासणी , खेळा बाबतचे सर्व दस्तऐवजची पाहणी, क्रीडा विभागाची जबाबदारी, चौकशीनंतर कार्यवाहीची शिफारस तसेच आवश्यकता वाटल्यास इतर बाबींची चौकशी आदी मुद्देच आयुक्तांनी ठरवून दिले होते.
समितीने या प्रकरणी चौकशी करून आयुक्तांना आपला अहवाल सादर केला आहे. सदर अहवालात ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासह त्याची पालिकेतील अनामत रक्कम जप्त करणे आणि पालिकेच्या संबंधित अधिकारी ह्यास नोटीस बजावून खुलासा मागवणे आदी बाबी नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयुक्तांकडे अहवाल सादर केला गेल्याने ते सोमवारी वा चालू आठवड्यातच त्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर क्रीडा संकुल आणि तेथील हॉटेल हे पालिकेने ठेकेदारास बंद करण्यास सांगितल्याने ते बंद केले गेले आहे.