कोलाचे पाणी तत्काळ बंद करा
By Admin | Updated: April 14, 2016 00:43 IST2016-04-14T00:43:16+5:302016-04-14T00:43:16+5:30
तालुक्यातील कुडूस येथील हिंदुस्थान कोका-कोला ही कंपनी दिवसरात्र लाखो लिटर मागणी वैतरणा नदीतून उचलते. सध्या तालुक्यात भीषण पाणीटंचाई सुरू आहे. तालुक्यातील महिलांना

कोलाचे पाणी तत्काळ बंद करा
वाडा : तालुक्यातील कुडूस येथील हिंदुस्थान कोका-कोला ही कंपनी दिवसरात्र लाखो लिटर मागणी वैतरणा नदीतून उचलते. सध्या तालुक्यात भीषण पाणीटंचाई सुरू आहे. तालुक्यातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मात्र प्रशासनाच्या आशिर्वादाने कंपनी दररोज भरपूर पाणी घेते. याला वाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध दर्शविला असून कोकाकोलाचे पाणी तात्काळ बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
वाडा तालुक्यात १ मार्च पूर्वीच नद्या, विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली चालली आहे. कित्येक वर्षापासून भूजलाच्या पाण्याचा सर्व्हे झालेला नाही. तो झाला पाहिजे. तालुक्यात बहुतांशी कूपनलिका, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी व नदी नाले मार्च मध्येच कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे कोका-कोला कंपनीचा पाणीपुरवठा त्वरीत खंडीत करून संपूर्ण जलसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावा अशी मागणी कुणबी सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख प्रफुल्ल पाटील यांनी आज तहसीलदारांना निवेदन देऊन तसे न झाल्यास येत्या आठ दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या संदर्भात वाडा पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कोका-कोला कंपनीला पाणी उचलण्याची सरकारने दिलेल्या परवानगीची मुदत मार्च महिन्यातच संपली असून तालुक्यातील पाणीटंचाई पाहता कंपनी उचलत असलेले वैतरणा बंधाऱ्याचे पाणी बंद करण्यात यावे अशी मागणी करणारा ठराव पंचायत समितीच्या मासिक सभेत केला असल्याची माहिती पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.
तर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पठारे यांच्याशी संपर्क साधला असता कोका-कोला कंपनीचे पाणी प्रशासनाने बंद केले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आचारसंहिता संपताच मोर्चा काढून पाणी बंद करण्यात येईल असे पठारे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सदानंद पाटील यांनी आमची सर्वपक्षीय आंदोलन करण्याची तयारी सुरू असून प्रशासनाने कोका-कोला कंपनीचे पाणी बंद केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. (वार्ताहर)