रेखांकने निश्चित झाल्याने बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 00:42 IST2021-03-10T00:41:55+5:302021-03-10T00:42:11+5:30
जागा हस्तांतराची पालिकेची प्रक्रिया पूर्ण

रेखांकने निश्चित झाल्याने बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा!
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : बुलेट ट्रेनसाठी वसई-विरार शहरातील जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली आहे. बुलेट ट्रेनसाठी जागा देणार नाही, असा ठराव तत्कालीन महासभेने दोन वर्षांपूर्वी केला होता. बुलेट ट्रेनमुळे वसईतील भूमिपुत्र, शेतकरी विस्थापित होणार असल्याने महापालिकेने या बुलेट ट्रेनला विरोध केला होता.
वसई-विरार शहरांतून जाणाऱ्या बुलेट ट्रेनला विरोध करणारा महापालिकेचा ठराव अखेर शासनाने कायमस्वरूपी विखंडित केला होता. पालिकेचा ठराव विखंडित करून बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून राज्य शासन आणि वसई-विरार महापालिकेत निर्माण झालेल्या संघर्षात राज्य शासनाने बाजी मारली होती. त्यानुसार वसई-विरारमधून बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी महापालिकेने विकास आराखड्यात तरतूद करून नुकतीच रेखांकने निश्चित केली आहेत. त्यामुळे आता वसई-विरार शहरातून बुलेट ट्रेन जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील ७०.०९ हेक्टर जमीन संपादित केली करणार आहे. त्यात ६०.४० हेक्टर खासगी क्षेत्र, ७.४५ हेक्टर वनक्षेत्र आणि २.२३ शासकीय जमिनीचा समावेश आहे.
७३ गावे होणार बाधित
या बुलेट ट्रेनच्या मार्गामुळे पालघर जिल्ह्यातील ७३ गावे बाधित होणार आहेत. त्यात वसई तालुक्यातील विरार, कोपरी, चंदनसार, नालासोपारा येथील बिलालपाडा, मोरे, पोमण, मोरी, बापाणे, ससूनवघर, नागले, सारजा मोरी, नारिंगी, जुली बेट अशा एकूण २१ गावांचा समावेश आहे.