पार्टीबाज अभियंत्यांना मिळणार क्लीन चिट
By Admin | Updated: April 23, 2017 03:58 IST2017-04-23T03:58:55+5:302017-04-23T03:58:55+5:30
मद्यधुंद अवस्थेत पार्टीची मजा लुटणाऱ्या वसई विरार महापालिकेच्या वादग्रस्त बारा ठेका अभियंत्यांची चौकशी करण्यासाठी दुसरी समिती स्थापन करण्यात आली आहे.

पार्टीबाज अभियंत्यांना मिळणार क्लीन चिट
- शशी करपे, वसई
मद्यधुंद अवस्थेत पार्टीची मजा लुटणाऱ्या वसई विरार महापालिकेच्या वादग्रस्त बारा ठेका अभियंत्यांची चौकशी करण्यासाठी दुसरी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या वादग्रस्त पार्टीत बेकायदा बांधकाम करणारे बिल्डर होते किंवा नाही केवळ याचीच तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे या पार्टीबाज बारा ठेका अभियंत्यांचे महापालिकेत पुनर्वसन होणार हे निश्चित मानले जात आहे.
यातील प्रमुख अभियंत्यांचे महापालिकेतील बडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी घनिष्ट संबंध असल्याने त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चौकशीचा फार्स पूर्ण करून येत्या आठ दिवसात सर्वांंना पु्न्हा कामावर घेतले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
वसई विरार महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकात ठेका पद्धतीवर काम करणारा ठेकेदार स्वरुप खानोलकर यांच्या बर्थ डेची जंगी पार्टी झाली. त्यात हे अभियंते मद्यधुंद होऊन नाचत होते. इतकेच नाही तर अवघ्या पंधरा-वीस हजाराची कंत्राटी पद्धतीवर नोकरी करणाऱ्यांच्या पार्टीत फटाक्यांचीही जंगी आतषबाजी केली गेली.
पैशांच्या धुंदीत असलेल्या ठेका अभियंत्यांची ही मस्ती व्हायरल झाल्याने वसईकरांना पहावयास मिळाली. पार्टीत अतिक्रमणविरोधी पथकात काम करणारे ठेका अभियंता नरेंद्र संख्ये, योगेश सावंत, रोशन भगत, केयूर पाटील, प्रवीण मुळीक, निनाद सावंत, कौस्तुभ तामोरे, निलेश मोरे, इंद्रजीत पाटील, परमजीत वर्तक, युवराज पाटील मौजमजा करताना दिसत होते.
ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर रविवार असतांनाही ५ फेब्रुवारीला आयुक्त सतीश लोखंडे यांनी या सर्वांना तात्काळ सेवामुक्त केले होते. खरे तर सर्वज़ण ठेका पद्धतीवर काम करणारे वादग्रस्त अभियंते आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर महापालिकेचे सर्वच सहाय्यक आयुक्त नाराज आहेत.
मात्र, आयुक्त लोखंडे, उपायुक्त अजीज शेख आणि काही बड्या लोकप्रतिनिधींशी यातील अभियंत्यांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळेच या अभियंत्यांवर अन्याय होऊ नये असा आव आणून याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुकत किशोर गवस यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नेमण्यात आली होती. पण, तिने चौकशी पूर्ण केली नाही. त्यातच गवस यांची बदली झाली. त्यामुळे आता अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नेमण्यात आली आहे. त्यात मुख्य लेखापरिक्षक प्रकाश कोळेकर, मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रवीण वडगाई आणि कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांचा समावेश आहे. ही समिती चौकशी करून आठवड्याभरात आपला अहवाल सादर करणार आहे.
अधिकारी लोकप्रतिनिधी यांची फिल्डींग
- आता त्या पार्टीत बेकायदा बांधकाम करणारे बिल्डर हजर होते किंवा नाही याचीच तपासणी केली जाणार आहे. खाजगी पार्टीत दारु पिणे किंवा नाचणे गैर नसल्याने त्याकडे समिती दुर्लक्ष करणार आहे.
- पार्टी खाजगी असल्याने अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर हजर होते किंवा नाही याची माहिती कोण देणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे वादग्रस्त अभियंत्यांची बाजू खरी ठरवून त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी लावलेली फिल्डींग यशस्वी होणार आहे.