वसईच्या उघड्या नाल्यातून केमिकलचे पाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:45 IST2019-08-27T23:45:24+5:302019-08-27T23:45:54+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : रासायनिक, औषधी कंपन्यांमुळे नदी-नाल्यांमध्ये रसायने; पर्यावरण, मानवी आरोग्याला धोका

वसईच्या उघड्या नाल्यातून केमिकलचे पाट
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार/नालासोपारा : वसई पूर्वेला केमिकल व औषध कंपन्यांचे प्रमाण वाढू लागल्याने नदी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल सोडले जात आहे. यामुळे नागरिकांना, प्राण्यांना तसेच पर्यावरणाला देखील हानी होत आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत असे प्रकार सुरु असूनही पालिका प्रशासन यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.
वसई पूर्वेला औषधी कंपन्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने पर्यावरणासाठी ते धोकादायक ठरत आहे. या कंपन्या गेल्या अनेक महिन्यांपासून विषारी पाणी नदी नाल्यांमध्ये सोडत आहेत.
गल्ली आणि रस्त्याच्या किनारी असलेल्या नाल्यांमधून केमिकलयुक्त घाण पाण्यामुळे विविध आजार जोमाने पसरत आहेत. केमिकलचे पाणी छोट्या मोठ्या गटारांमधून शेतात आणि खाडीपर्यंत पोहोचत आहे. हिरव्या, निळ्या, लाल, पिवळ्या रंगाचे केमिकलचे पाणी मासे, शेती आणि पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवत आहे. काही महिन्यांपूर्वी हेच केमिकलयुक्त पाणी प्यायल्याने ७ गायींचा मृत्यू झाला होता.
या कंपन्यांमध्ये जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या नाकावर टिच्चून या अनधिकृत कंपन्या सुरू असून याबद्दल स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही याकडे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कानाडोळा करतो आहे. स्थानिकांनी लोकमतला सांगितले की, या केमिकल कंपन्यांचे मालक कायद्याचे उल्लंघन करून कंपनीतून निघणाऱ्या कचºयाचे ढीग रस्त्यावर टाकत आहेत तर केमिकलचे पाणी गटारे, नाल्यांमधून, रस्त्यावर बिनधास्तपणे सोडून देत आहे. या केमिकलच्या उग्र वासामुळे अनेकांना श्वसनाचे आजार झाले आहेत पण याचे कोणालाही काहीही सोयरसुतक नाही. या कंपन्यांमध्ये अनेकदा आग लाग्ण्याच्या घटना घडलेल्या आहेत तर या कंपन्यांमुळे वायू आणि जल प्रदूषण वाढत चालले आहे.
कंपनीतून येणाºया पाण्यामुळे दुर्गंधी पसरते आहे. यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे मोठे आजार पसरण्याची भीती आहे. याठिकाणी लहान मोठ्या अशा मिळून एकूण चार हजार कंपन्या आहेत तर यांच्यापैकी मोजक्या कंपन्यांकडे अधिकृत परवानगी आहे. इतर कंपन्या या अनधिकृत आहेत तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आहे.
दरम्यान, हे विषारी पाणी शेतीमध्ये जात असल्याने शेतीत उगवणारा भाजीपाला देखील दूषित होत आहे. यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. महानगरपालिकेने नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
वसई पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहेत. छोट्या मोठ्या मिळून अंदाजे ४ हजारपेक्षा जास्त कंपन्या सुरू आहे. यापैकी काही कंपन्यांना परवानगी नसून त्या अनधिकृतपणे सुरू आहे. काही कंपन्यांना तर अग्निशामक दलाची एनओसी पण मिळालेली नाही. कपन्यांमधून निघणारा कचरा, केमिकल आणि धुरामुळे पर्यावरणाला धोका आहे. शेतात केमिकलयुक्त पाणी शेतात गेल्याने उगवले जाणारे धान्य आणि भाजीपाला दूषित होत आहे.
- राजकुमार चोरघे, ज्येष्ठ समाजसेवक व माजी नगरसेवक
रंगीबेरंगी केमिकल युक्त पाण्यामुळे सर्वत्र उग्र वास पसरला जात आहे. यामुळे डासांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. आमच्या घराच्या आजूबाजूच्या नाल्यातून हे केमिकलयुक्त पाणी खाडीकडे जाते. अनेकवेळा तक्रारी करूनही काहीही कारवाई होत नाही.
- राजू पाटील, स्थानिक रहिवाशी
मी नव्यानेच हजर झालो असून कंपन्यांबाबत लेखी तक्र ार आल्यावर नक्कीच चौकशी करून कारवाई करणार. तसेच याआधी कोणत्या कंपन्यांची तक्र ार आली आहे का याची माहिती घेतो.
- शरद पवार,
फिल्ड आॅफिसर, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ, ठाणे
कुठे कुठे
आहेत कंपन्या
वसई पूर्वेकडील गोलानी, वालीव, धुमाळ नगर, वसई फाटा, खैरपाडा, चिंचपाडा, गावराई पाडा, सातीवली, भोयदापाडा, अग्रवाल नगर, कामण, चिंचोटी, मुंबई अहमदाबाद महामार्ग, रिचर्ड कंपाऊंड, वाकणपाडा, शालिमार अश्या अनेक परिसरात आजपण केमिकल कंपन्या अनधिकृतपणे सुरू आहेत. काही केमिकल कंपन्यांमध्ये आग लागण्याच्या अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत.