पीक विम्यातील बदल शेतकऱ्यांच्या पथ्यावर
By Admin | Updated: September 1, 2015 23:50 IST2015-09-01T23:50:03+5:302015-09-01T23:50:03+5:30
पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने आता या योजनेत बदल केला असून नव्या पीक विमा योजनेमुळे ग्रामीण भागातील

पीक विम्यातील बदल शेतकऱ्यांच्या पथ्यावर
वसई : पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने आता या योजनेत बदल केला असून नव्या पीक विमा योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवीन बदलांनुसार, शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या हप्त्यामध्ये ३ टक्क्यांनी कपात होणार आहे. सध्या शेतकऱ्यांना ३.५ ते ८ टक्क्यांपर्यंत पीक विमा योजनेचे हप्ते भरावे लागत आहेत.
ग्रामीण भागातील शेतीला संजीवनी देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी पीक विमा योजना सुरू केली होती. या योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नव्हता. तसेच त्यातील उंबरठा पद्धतीमुळे शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळणे कठीण झाले होते. याबाबत, तत्कालीन कृषिमंत्री केळवे येथे एका कार्यक्रमासाठी आले असता लोकमतने या संवेदनशील प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. याबाबत केंद्र सरकारच्या कृषी खात्याने नव्या राष्ट्रीय पीक योजनेचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार, शेतकऱ्यांना कमीतकमी हप्ते भरावे लागणार आहेत. या पीक विमा योजनेत खाजगी कंपन्यादेखील विमा उतरवू शकतात. आगामी रब्बी हंगामात ही योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
(प्रतिनिधी)