A chain of villagers against the port in Wadhwan; Controversy over biodiversity surveys | वाढवणमध्ये बंदरविराेधात ग्रामस्थांची साखळी; जैवविविधतेच्या सर्वेक्षणाला विराेध

वाढवणमध्ये बंदरविराेधात ग्रामस्थांची साखळी; जैवविविधतेच्या सर्वेक्षणाला विराेध

शौकत शेख

डहाणू : पश्चिम किनारपट्टीवरील वाढवण गावात जागतिक स्तरावरचे बंदर उभारण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दुसऱ्या बाजूला शेतकरी, मच्छीमार, बागायतदार या बंदराला ठाम विराेध करत आहेत. या पार्श्वभूमीवर वाढवण समुद्र किनारपट्टीच्या खडकांमध्ये जैवविविधतेच्या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांना राेखण्यासाठी बुधवारी वाढवण बंदर संघर्ष समिती आणि तिच्या संलग्न संघटनांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मानवी साखळी उभारून काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. शेकडाे महिलांनी किनाऱ्यावर बैठक मारून ‘वाढवण बंदर हटाव’ असे मानवी शिल्प तयार केले हाेते. तर ‘जेएनपीटी चले जाव, चले जाव’च्या गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

हा सर्व्हे रोखण्यासाठी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि तिला पाठिंबा दिलेल्या महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, नॅशनल फिशवर्कर्स आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी मच्छीमार संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, आदिवासी एकता परिषद, भूमी सेना कष्टकरी संघटना यांचे शेकडो कार्यकर्ते या आंदाेलनात सहभागी झाले हाेते. सर्व्हेसाठी पथक आले नसले तरी शेकडो महिला-पुरुषांनी मानवी साखळीने किनारा संरक्षित केला होता. यावेळी झालेल्या सभेत नारायण पाटील, काळूराम धोधडे, ज्योती मेहेर, जयप्रकाश भाय, अशोक अंभिरे, ब्रायन लोबो, अनिकेत पाटील, वैभव वझे, विनीता राऊत, हेमंत पाटील, दत्ता करबट आदी सहभागी झाले हाेते. वाढवण बंदरामुळे शेती, बागायती, मच्छीमारी व्यवसाय नष्ट होणार असून या बंदराला सर्वांनी संघटितपणे विरोध करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

गावाला आले पोलीस छावणीचे स्वरूप 
दिवसभर वाढवणमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही संध्याकाळी ३००-४०० पोलिसांची कुमक गावात दाखल झाली. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामुळे ग्रामस्थ बाहेर पडले आणि संतप्त ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न करून त्यांना परत पाठवले. 

Web Title: A chain of villagers against the port in Wadhwan; Controversy over biodiversity surveys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.