जनगणनेचे काम : अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
By Admin | Updated: November 22, 2015 00:06 IST2015-11-22T00:06:57+5:302015-11-22T00:06:57+5:30
पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना जनगणनेच्या कामांची सक्ती तसेच जबरदस्ती केली असून पालन न केल्यास केसेस दाखल करण्यात येत असल्याच्या धमक्यांमुळे

जनगणनेचे काम : अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
पालघर : पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना जनगणनेच्या कामांची सक्ती तसेच जबरदस्ती केली असून पालन न केल्यास केसेस दाखल करण्यात येत असल्याच्या धमक्यांमुळे अंगणवाडी सेविकामध्ये असंतोष पसरला असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन पुर्णवेळ कर्मचारी मानत नाही. हे कर्मचारी मानसेवी व अर्धवेळ कर्मचारी समजले जातात. अंगणवाडी कर्मचारी या सर्व महिला कर्मचारी असल्याने त्यांना आपले कुटूंब सांभाळून त्यांच्या योजनांचे अर्धवेळ काम करावे लागते. त्यांना दिलेल्या योजनेच्या कामामध्ये २० ते २२ अत्यावश्यक कामे रोजच्या रोज करावी लागत असून जिल्ह्णातील बालमृत्यू व अतिकुपोषीत बालकांच्या व त्यांच्या माता संदर्भात कसोशीने देखरेख ठेवावी लागते. अंगणवाडी सेवीकांना, कर्मचाऱ्यांना अंगणवाडीच्या कामाखेरीज योजनाबाह्ण कामे सांगण्यात येऊ नयेत असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभाग, दिल्ली यांनी अंगणवाडी सेविकावर योजनाबाह्ण कामे लादु नयेत असे आदेशही काढले आहेत.
असे असताना जिल्हाधिकारी कार्यालयातुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जनगणनेचे योजनाबाह्ण काम करण्याबाबत सक्ती व जबरदस्ती केली जात असल्याचे शासनाच्या या सक्तीचा व जबरदस्तीचा निषेध नोंदविण्यासाठी आज संघटनेचे अध्यक्ष एम. ए. पाटील, सरचिटणीस बुजपाल सिंह, कार्याध्यक्ष मंगला बरफ, राजेश सिंग, सुमन पिंपळे, नलीनी राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थाळीनाद करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी भारताचे नागरीक म्हणून जनगणनेच्या कामाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी शिष्टमंडळाला केले. (वार्ताहर)