मीरा रोड : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावून ९ कोटींचा फायदा दाखवत तो फायदा मिळविण्यासाठी आणखी पैसे उकळून सायबर लुटारूंनी मीरा रोडच्या एका व्यावसायिकाची तब्बल ३ कोटी १२ लाख ८१ हजार रुपयांना फसवणूक केली. पोलिस आयुक्तालयात ऑनलाइन फसवणूक झालेल्या गुन्ह्यांपैकीची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी फसवणूक आहे.
मीरा रोडच्या जीसीसी क्लबजवळ हबटाऊन गार्डेनिया भागात राहणारे व्यावसायिक नीलेश नरेंद्र कोतनीस (वय ५०) यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसंदर्भातील एका नामांकित बँकेचे नाव वापरून बनवलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नोव्हेंबरमध्ये ॲड केले होते. त्या ग्रुपमध्ये संबंधितांच्या सांगण्यानुसार गुंतवणूक केल्यावर भरपूर फायदा होत असल्याचे आमिष दाखविले.
फायदा काढता येईना- पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतनीस यांना नामांकित बँकच्या नावाने असलेले मोबाइल ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यात पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यांनी बँक खात्यातून ऑनलाइन पैसे गुंतविण्यास सुरुवात केली. त्यांना त्या ॲपमध्ये ९ कोटी रुपयांपर्यंतचा फायदा झाल्याचे दाखविण्यात आले. - झालेला फायदा काढून घेण्यासाठी कोतनीस यांच्याकडे शुल्क म्हणून आणखी पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पैसे भरले. परंतु, मुद्दल आणि दाखवला जात असलेला फायदा मात्र त्यांना काढता येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. - याप्रकरणी काशिगाव पोलिस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिल्यावर पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी या गुन्ह्यातील ५ मोबाइल क्रमांकधारक तसेच व्हॉट्सॲप ग्रुपशी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पुजारी हे अधिक तपास करीत आहेत.