मांजाने जखमी झालेल्या पक्ष्यांना दाखवली ‘करुणा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 23:13 IST2020-01-16T23:13:29+5:302020-01-16T23:13:37+5:30
विरारमधील ट्रस्टचा उपक्रम : २३ पक्षी जखमी तर ६ पक्ष्यांचा झाला मृत्यू

मांजाने जखमी झालेल्या पक्ष्यांना दाखवली ‘करुणा’!
विरार : देशभरात मकरसंक्रांतीचा सण बुधवारी उत्साहात साजरा झाला. या सणादरम्यान पतंगबाजी करताना असंख्य पक्ष्यांचा मृत्यू व जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यातील २३ जखमी पक्ष्यांवर विरारच्या करुणा ट्रस्टने यशस्वी उपचार करून १७ पक्ष्यांना जीवनदान दिले. दुर्दैवाने यात ६ पक्ष्यांचा मृत्यू झाला. करुणा ट्रस्टने केलेल्या या कार्यावर प्राणीप्रेमींकडून आनंद व्यक्त होत आहे.
दरवर्षी मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक पक्षी मांज्यांमध्ये जखमी अवस्थेत अडकल्याच्या घटना समोर येतात. यावर विरारच्या करुणा ट्रस्टने आधीच पक्षी वाचवण्याचा कार्यक्रम आखला होता. त्यानुसार मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी मंगळवारी व बुधवारी असा दोन दिवस मेडिकल कॅम्प लावून प्रशिक्षित स्वयंसेवक तयार केले होते. हे स्वयंसेवक पक्षीप्रेमींकडून पक्षी मांज्यात अडकल्याची माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी जाऊन जखमी पक्ष्याला कॅम्पमध्ये घेऊन यायचे. अशा प्रकारे दोन दिवसात कॅम्पमध्ये २३ पक्षी जखमी अवस्थेत आणले होते. यातील १७ पक्ष्यांना करुणा ट्रस्टने जीवनदान दिले.
या संदर्भात करुणा ट्रस्टचे मितेश जैन यांनी सांगितले की, मकरसंक्रांतीच्या सणात अनेक पक्षी जखमी झाले होते. यामध्ये मैना, कबुतर व चिमणी या पक्षांबरोबरच खारूताईचाही समावेश होता. यातील काही पक्ष्यांच्या पायाला तर काहींच्या पंखांना जखमा झाल्या होत्या. त्यावर व्यवस्थित उपचार करण्यात आले.
या कॅम्पमध्ये जखमी अवस्थेत दाखल झालेल्या पक्ष्यांना उपचारासाठी गोरेगाव येथील पक्ष्यांच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या रुग्णालयात त्यांच्यावर आता उपचार होणार आहेत. -मितेश जैन, अॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष व
करुणा ट्रस्ट.