वाड्यात नित्याचीच वाहतूककोंडी
By Admin | Updated: August 26, 2015 23:55 IST2015-08-26T23:55:33+5:302015-08-26T23:55:33+5:30
वाढते औद्यागिकीकरण, तालुक्यातील सरकारी कार्यालये, रुग्णालये आणि बाजारपेठा यामुळे सकाळी दहा ते दुपारी दोन व संध्याकाळी ४ ते ८ पर्यंत या भागात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम असते

वाड्यात नित्याचीच वाहतूककोंडी
- वसंत भोईर, वाडा
वाढते औद्यागिकीकरण, तालुक्यातील सरकारी कार्यालये, रुग्णालये आणि बाजारपेठा यामुळे सकाळी दहा ते दुपारी दोन व संध्याकाळी ४ ते ८ पर्यंत या भागात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम असते. साधारण खांडेश्वरी नाका ते एसटी स्टॅण्ड या रस्त्यावर वाहनांची मोठी कोंडी होत असल्याने सकाळी ठाणे, मुंबई शहरांत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व नोकरी, व्यवसायानिमित्त जाणाऱ्यांना रोजच त्रास सहन करावा लागतो. पार्किंगची सुविधा नसल्याने व रस्त्याच्या किनाऱ्यावर उभारलेल्या अनधिकृत स्टॉल्स व दुकानांमुळे हा त्रास होते आहे.
तालुक्यातील औद्योगिकीकरणामुळे येथील नागरिकांची संख्या वाढली आहे. वाडा ही तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असल्याने दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या खरेदीविक्रीसाठी तसेच सरकारी, निमसरकारी कामानिमित्ताने येथे सतत हजारो नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे वाडा बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, परळी नाका हे मुख्य रस्ते व परीसर नेहमीच गजबजलेला असतो. शिवाय, येथे खाद्यपदार्थ व लहानसहान वस्तूंच्या विक्रीसाठी हातगाड्या आणि टपऱ्या अनधिकृत बांधलेल्या आहेत. त्यामुळे अडथळा निर्माण होऊन वाहतूककोंडी होत आहे.
वाढत्या वर्दळीमुळे येथे वारंवार अपघातही झाले आहेत. या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असल्यामुळे पोलिसांनी नो पार्किंग फलक लावले आहेत. तरीही बाइक, हातगाड्या तेथेच उभ्या केल्या जातात. अनेक बाइकस्वारांवर पोलीस दंडाची कारवाई करीत आहेत, तरीदेखील परिस्थितीत सुधारणा होत नाही. रस्त्यावरील टपऱ्यांवरही खरेदी सुरू असते. त्यामुळे वाहतूककोंडी होते म्हणून या हातगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण वाडा गावात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून हातगाडीमुक्त वाडा करण्याचा प्रयोग करण्यात आला. यासाठी हजारो रुपये संरक्षणावर खर्च झाले. मात्र, लगेचच दुसऱ्या दिवशी हातगाड्या रस्त्यावर लागल्याने अतिक्रमण हटाव मोहीम म्हणजे फुसका बार ठरला. (वार्ताहर)
पर्यायी मार्ग निवडला...
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सी.जी. संख्ये यांच्याशी संपर्क साधला असता हा रस्ता अरुंद झाला आहे. शिवाय, अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळाले पाहिजे. या सगळ्या अवघड बाबींमुळे आम्ही आता देसईफाटा ते कांदिवली असा पर्यायी मार्ग निवडला असून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबत, वरिष्ठ पातळीवर चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती संख्ये यांनी दिली.
वाडावासीयांनी एकत्र यावे
वाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोहन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रस्ता रुंदीकरणासंदर्भात वाडावासीयांनी एकत्र येऊन सहकार्य केले तरच हे होऊ शकेल. अन्यथा, शक्य नाही. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सचिव देवेंद्र भानुशाली यांच्याशी संपर्क साधला असता या वाहतूककोंडीला सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.