खून प्रकरणी दोघांना जन्मठेप
By Admin | Updated: August 26, 2015 23:59 IST2015-08-26T23:59:26+5:302015-08-26T23:59:50+5:30
आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध करूनही ऐकत नसलेल्या सखाराम सुखाड खेवरा (३०, रा. झाडीपाडा, डहाणू) याच्या डोक्यात हातोडीने प्रहार करून त्याचा खून केल्याप्रकरणी लक्ष्मण दांडेकर

खून प्रकरणी दोघांना जन्मठेप
पालघर : आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध करूनही ऐकत नसलेल्या सखाराम सुखाड खेवरा (३०, रा. झाडीपाडा, डहाणू) याच्या डोक्यात हातोडीने प्रहार करून त्याचा खून केल्याप्रकरणी लक्ष्मण दांडेकर व त्याचा मुलगा सचिन दांडेकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. १८ आॅगस्ट रोजी मंगळवारी पालघरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एस. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.
डहाणू तालुक्यातील गांगणगाव (दांडेकरपाडा) येथे राहणारे लक्ष्मण धर्मा दांडेकर यांची मुलगी गुजरात राज्यातील उंबरगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात कामावर जायची. तिचे तेथेच कामावर असलेल्या सखाराम खेवरा याच्याशी पे्रमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या वडिलांना कळल्यानंतर त्यांनी सखारामच्या घरी जाऊन माझ्या मुलीला तुमच्या घरात द्यावयाची नाही, तरी सखाराम याने माझ्या मुलीचा नाद सोडावा, अशी समज दिली होती. परंतु, त्या दोघांचे लपूनछपून प्रेमसंबंध सुरूच राहिल्याने दि. २२ जानेवारी २०११ रोजी आरोपी लक्ष्मण दांडेकर व त्याचा मुलगा सचिन दांडेकर यांनी वसा-करजगाव रस्त्यावर कामावरून सायकलवर येणाऱ्या सखाराम यास गाठले. या वेळी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर आरोपींनी आपल्या मोटारसायकलच्या डिकीमध्ये लपवून ठेवलेला लोखंडी हातोडा काढून सखारामच्या डोक्यात घातला. सखारामला जखमी अवस्थेत तलासरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी गणपत खेवरा यांनी तलासरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याप्रकरणी न्यायालयाने २८ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. सरकारी वकील पी.एच. पटेल यांनी पुरावे न्यायालयापुढे सादर केले.