विक्रमगडच्या बाजारात कर्नाटकी फणसांची धूम
By Admin | Updated: May 7, 2017 01:34 IST2017-05-07T01:34:27+5:302017-05-07T01:34:27+5:30
ध्या कोकणातील फणस बाजारात आलेला नसला तरी कर्नाटकातल्या फणसाने विक्रमगडच्या बाजारात धूम

विक्रमगडच्या बाजारात कर्नाटकी फणसांची धूम
राहुल वाडेकर / लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : सध्या कोकणातील फणस बाजारात आलेला नसला तरी कर्नाटकातल्या फणसाने विक्रमगडच्या बाजारात धूम चालविली आहे. कोकणी फणस येण्यात अजून किमान तीन आठवडे बाकी आहेत. त्या आधीच हा फणस आल्याने खवैय्ये खूष आहेत.
फणसाचा खरा उगम व जादा उत्पादन हे कोकणात होते कोकण मेवा म्हणजेच फणस तेथूनच तो अनेकविध भागात विक्रीला येत असतो़ व आता तर कच्च्या फणसापासून देखील विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनविले जात असल्याने उपवासाला व इतर वेळेसही या पदार्थांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालेली आहे़ त्यामुळे सध्या फणसाचे उत्पादन घेण्याकडे कल वाढलेले दिसत आहे़
परंतु अदयाप चांगला फसण तयार होण्यास किमान २१ दिवसांचा काळ जाणार आहे त्यामुळे कोकणातील फणस अदयाप बाजारात दाखल झालेला नाही़ त्याच बरोबर वातावणात बदल झाल्याने आंबा, काजूंवर जसा परिणाम झाला तसाच वातावरणाचा देखील फणसांच्या उत्पादनावर परीणाम झाला आहे. त्यामुळे यंदा कोकणातील मेव्याची आवक थोडयाफार प्रमाणात घटणारच आहे़ याच गोष्टींचा फायदा घेऊन कर्नाटकीय फणस बाजारात दाखल झालेले आहेत. फणस दिसला की प्रत्येकाला कोकणाची आठवण होते़ कारण बाजारात येणारे बहुतेक फणस हे कोकणातलेच असतात़ हे फणस मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून बाजारात दाखल होतात़ मात्र विक्रमगड व परिसरातील बाजारपेठेत मेच्या सुरुवातीलाच फणासाचे गरे दिसू लागले आहेत़ खाण्यास गोड व उन्हात थंडावा देणारे असल्याने फणस खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंंबड उडते आहे़ परंतु काही ग्राहकांनी सांगितले की कोकणातील फणसाला जी गोडी व स्वाद, चव आहे तो हया कर्नाटकीय फणसामध्ये तेवढया प्रमाणात नाही़ विक्रमगड तालुक्यातही आता मोठया प्रमाणावर आदिवासी लोक देखील फणसांचे उत्पन्न घेत आहेत. एका झाडाला मोठया प्रमाणावर फणसाची फळे येत असल्याने चांगले अर्थार्जन होते. कर्नाटकीय फणसाच्या सुगंधाने बाजारात घमघमाट पसरलेला आहे़ वटपोर्णिमेला महिलांना फणसाच्या गऱ्याची आवश्यकता असते म्हणून पुजेसाठी फणसाला मागणी मोठया प्रमाणात असते़ मात्र यंदा मे महिन्याचें सुरुवातीलाच फणसाची आवक वाढली आहे. हा फणस कर्नाटकातूनच येत असल्याचे येथील विक्रेते सुरेंद्रम यांनी सांगितले. फणसाचे गरे ९० रुपये किलो या दराने विकले जात आहेत. एका फणसासाठी २५० ते ३०० रुपये मोजावे लागत आहेत. आवक वाढल्यानंतर हेच गरे ५० ते ६० रुपये किलो दराने विकले जातात़ कोकणाचा फणस येण्याच्या अगोदरच विक्रमगडच्या बाजारात कर्नाटकीय फणसाने ग्राहकांना भुरळ घातली आहे़ त्यामुळे सध्यातरी ग्राहक महाग का होईना फणसाचे गरे मोठया आवडीने खरेदी करत आहेत़
पिकण्यापूर्वीच फणस आणले बाजारात
बाजारात विक्री होत असलेल्या फणसांपैकी अनेक फणस पुरेसे पिकलेले नाहीत. असेही आढळून येते इतरांपेक्षा लवकर बाजारात माल नेऊन तो विकण्याला व्यापाऱ्यांनी प्राधान्य दिल्यामुळे हे घडते आहे. त्यामुळे फणस विकत घेतला तरी तो काही दिवस घरात पिकवून मग खाण्याचा द्राविडी प्राणायाम ग्राहकांना करावा लागतो आहे. छोट्या फणसाच्या बाबतीत हा अनुभव अनेकांना आलेला आहे.