बड्यांचे इरादे संपकरी सराफांनी हाणून पाडले
By Admin | Updated: April 9, 2016 02:07 IST2016-04-09T02:07:07+5:302016-04-09T02:07:07+5:30
संपातून माघार घेऊन गुढीपाडव्याचा सोनेरी मुहूर्त साधण्याचा बड्या सराफांचा इरादा वसईतील सराफांच्या एकजुटीने हाणून पाडला.

बड्यांचे इरादे संपकरी सराफांनी हाणून पाडले
वसई : संपातून माघार घेऊन गुढीपाडव्याचा सोनेरी मुहूर्त साधण्याचा बड्या सराफांचा इरादा वसईतील सराफांच्या एकजुटीने हाणून पाडला. सकाळीच सराफांनी बड्या दुकानांसमोर हंगामा करीत दुकाने उघडू दिली नाहीत. सराफांचा संताप पाहून पाचही सराफांनी आपली दुकाने उघडण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे आता वसईत बड्या सराफांविरोधात संघर्ष सुुरू झाला आहे.
केंद्र सरकारच्या जाचक धोरणाविरोधात देशभरातील सराफ बेमुदत संपावर गेले आहेत. वसईसह पालघर जिल्ह्यातील १८०० सराफ संपात सहभागी झाले आहेत. मात्र, वसईतील नवघर-माणिकपूर शहरांत असलेल्या पाच बड्या सराफांनी संपातून लगेचच माघार घेऊन आपली दुकाने उघडली होती. गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधण्याचा डाव सराफांच्या एकजुटीने हाणून पाडला.
संध्याकाळपर्यंत सराफ दुकानांसमोर बसूनच होते. त्यांनी एकही दुकान उघडू दिले नाही. दुकाने उघडली जाऊ नयेत, यासाठी आंदोलनकर्ते सराफक्रिकेट खेळत होते. कर भरण्यास कुणाचाही विरोध नाही. पण, केंद्र सरकारच्या जाचक धोरणांमुळे छोटे व्यावसायिक देशोधडीला लागणार आहेत. त्याविरोधात आमचा लढा आहे. बड्या व्यावसायिकांनी आम्हाला साथ देणे अपेक्षित आहे.
आम्ही त्यांना अनेक वेळा प्रेमाने समजावून सांगितले आहे. आता प्रेमाची भाषा संपली असून यापुढे त्यांचे सहकार्य लाभले नाही तर शिवसेना स्टाइल आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा वसई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष वीरेंद्र बोरा यांनी लोकमतशी बोलताना दिला. त्यामुळे बड्या सराफांविरोधात संपकरी सराफांनी संघर्षाला सुरुवात केली आहे.
(प्रतिनिधी)