भांडण सोडवणाऱ्या पोलिसाला चावा
By Admin | Updated: July 28, 2016 03:27 IST2016-07-28T03:27:23+5:302016-07-28T03:27:23+5:30
नवराबायकोचे भांडण पोलीस हवालदाराला चांगलेच महाग पडले. वालीव पोलीस ठाण्याचे हवालदार किरण साळुंखे हे नवराबायकोचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता नवरा विकास रमेश सिंग

भांडण सोडवणाऱ्या पोलिसाला चावा
वसई/पारोळ : नवराबायकोचे भांडण पोलीस हवालदाराला चांगलेच महाग पडले. वालीव पोलीस ठाण्याचे हवालदार किरण साळुंखे हे नवराबायकोचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता नवरा विकास रमेश सिंग याने चक्क हवालदार साळुंखे यांच्या हाताला चावा घेत जखमी केले. सिंगविरोधात सरकारी कामात अडथळा, पोलिसाला मारहाण व शिवीगाळ या गुन्ह्यांची वालीव पोलिसात नोंद करून त्याला ताब्यात घेतले.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तुंगारफाटा येथे विकास सिंग वास्तव्यास असताना त्यांचे आपल्या पत्नीशी घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाले. याबाबत विकासच्या पत्नीने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर विकासने पुन्हा आपल्या पत्नीला मारहाण केल्याने तिने पुन्हा पोलीस ठाणे गाठले. तेव्हा ते भांडण सोडवण्यासाठी दोन हवालदार त्यांच्या घरी गेले असता त्याने पोलिसांना शिवीगाळ केली. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी त्याचा हात पकडला असता आरोपीने हवालदार साळुंखे यांच्या हाताला जोरात चावा घेतला.